माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपती पदाची संधी?; मोदी-शाह यांची नवी खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 09:51 AM2022-07-08T09:51:09+5:302022-07-08T09:52:31+5:30
प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - येत्या १८ जुलै रोजी देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी संयुक्त उमेदवार म्हणून उभं केले आहे. राष्ट्रपतीपदानंतर लगेच उपराष्ट्रपतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाला उभं करणार याबाबत विविध नावं पुढे येत आहेत.
महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपाला यश आले आहे. भाजपाने १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आणखी एक खेळी होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी शिवसैनिकालाच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची बातमी आहे.
माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले आहे. प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. अमित शाह आणि सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाली असून उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता दिल्लीच्या वर्तुळात बोलली जात आहे.
Meeting Hon Home minister @AmitShah ji today. Very interesting exchange of ideas on several issues.@AmitShahOfficepic.twitter.com/vWXX2VBitH
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) July 7, 2022
४ महिन्यापूर्वी सक्रीय राजकारणातून घेतला सन्यास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं होते. यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा आहे असं सुरेश प्रभू यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होते.
कोण आहेत सुरेश प्रभू?
सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य अशी दमदार खाती सांभाळली होती. प्रभू पेशाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत. ते मूळचे शिवसेनेचे नेते, पण मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी त्यांना भारतीय जनता पक्षात सामावून घेण्यात आले होते. प्रभू अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यावेळी नद्या जोड प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच त्यांना मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. १९९६ मध्ये सुरेश प्रभू यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. १९९८, १९९९ लोकसभेतही त्यांनी विजय मिळवला होता. १९९८ ते २०१४ काळात ते केंद्रात मंत्री होते. २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा सिंधुदुर्ग मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये सुरेश प्रभूऐवजी विनायक राऊत यांना शिवसेनेने तिकीट दिले. तेव्हापासून ते शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणापासून दूर गेले. हीच संधी साधत भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारीही सोपवली