Arun Jaitley Death: देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 12:37 PM2019-08-24T12:37:53+5:302019-08-24T12:53:54+5:30
Arun Jaitley Death: नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
अरुण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू कँसर हा दुर्मीळ आजार झाला होता. या आजारावरील उपचारासाठी ते १३ जानेवारी रोजी अमेरिकेत गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते भारतात परत आले होते. दरम्यान, जेटलींच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जेटली यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेटलींकडे वित्त आणि संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. पुढे मनोहर पर्रिकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवली गेली. मात्र पर्रीकर हे गोव्यात परतल्यावर पुन्हा एकदा जेटलींकडे संरक्षक मंत्रिपदाचा कार्यभार सोपवला गेला होता. पुढे निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद येईपर्यंत जेटलींनी संरक्षण मंत्रालय सांभाळले होते.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019
अरुण जेटली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय :
- नोटबंदी
- वस्तू व सेवा कर प्रणालीची देशभर अंमलबजावणी
- रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट
- देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय