माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन दोषी
By admin | Published: February 25, 2016 03:20 AM2016-02-25T03:20:30+5:302016-02-25T03:20:30+5:30
भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना १९९३-९४ मध्ये सरकारी दुकानांच्या वितरणातील घोटाळ्याबद्दल दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
नवी दिल्ली : भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना १९९३-९४ मध्ये सरकारी दुकानांच्या वितरणातील घोटाळ्याबद्दल दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या घोटाळ्यातील दोघा जणांना सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव आगरवाल यांनी निर्दोष ठरवले आहे.
केंद्रीय नगरविकास आणि रोजगारमंत्री शीला कौल आणि आणखी एक आरोपी तुलसी बालोडी यांचे खटल्याची सुनावणी सुरू असताना निधन झाल्याने त्यांच्यावरील आरोप काढण्यात आले. अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री असलेले पी.के. थुंगन यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट, भ्रष्टाचार आदी आरोप ठेवण्यात आले होते. थुंगन यांना १९९८ सालातील केंद्रीय निधीच्या गैरवापराबद्दल गेल्या वर्षी साडेचार वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली.
त्यामुळे ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या शिक्षेबाबत उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहेत.
सीबीआयने थुंगन आणि शीला कौल या दोघांनी सार्वजनिक सेवक या नात्याने अप्रामाणिकपणे, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून आणि कटकारस्थान रचून दिल्लीत सरकारी दुकानांच्या गाळ्यांचे वितरण केले, असा आरोप ठेवला होता.