“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:35 PM2022-07-05T12:35:18+5:302022-07-05T12:35:58+5:30

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे.

former union minister salman khurshid said atmosphere in the country has deteriorated racism is on the rise | “देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

Next

इंदोर: माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. इंदोरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सलमान खुर्शीद यांनी यावरून उघडपणे भाष्य केले. देशातील वातावरण बिघडत चालले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे. भारतातील नागरिक सुखी असल्याचे पाहायला मिळत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोभ तसेच दुसरे म्हणजे बदल घडवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.  

देशातील वाढत्या जातीय तणावावरही त्यांनी आपले मत मांडले. सलमान खुर्शीद म्हणाले की, आजच्या घडीला देशात जातीय बाबींना जाणीवपूर्वक महत्त्व दिले जात आहे. विविध वर्गांमध्ये तेढ वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक एकमेकांवर घृणास्पद आरोप करत आहेत. यामागे राजकीय कारणे आहेत. देशवासीयांची विचारसरणी अशी नाही. याला कोणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सयंम बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे

नुपूर शर्माप्रकरणी बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणतीच उच्च संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाला आदरपूर्वक सांगू शकतो की, यावर पुनर्विचार करावा. परंतु, सर्वोच्च न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. 

लोभामुळे हे सगळे घडतेय

देशात उद्भवलेल्या सद्य स्थितीमागील कारण लालसा, लोभ असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. आता पैसा चालत नाही, मग लोक धर्माचा आसरा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला आता अशा नेतृत्वाची गरज आहे, जे या विचारसरणीत बदल घडवून आणेल, जसा बदल राष्ट्रपिता महात्मा गांधीनी घडवून आणला होता, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसने आपल्या सद्यस्थितीबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशात नेमके असे काय बदल झाले आहेत, ज्यामुळे आपण देशातील राजकारणात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले आहोत, असे नमूद करत, देशातील वातावरण चांगले नसून, देशवासी सुखाने नांदताना दिसत नाहीत, असा दावा खुर्शीद यांनी केला. 
 

Web Title: former union minister salman khurshid said atmosphere in the country has deteriorated racism is on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.