युपीएचे माजी मंत्री असुरक्षित

By admin | Published: February 22, 2015 12:13 AM2015-02-22T00:13:49+5:302015-02-22T00:13:49+5:30

अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

Former UPA minister unprotected | युपीएचे माजी मंत्री असुरक्षित

युपीएचे माजी मंत्री असुरक्षित

Next

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तांतरामुळे प्रशासकीय पातळीवर, तसेच धोरणात्मक बदल होणे स्वाभाविक असले तरी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन काहींची सुरक्षा काढून घेणे आणि काहींना कमी दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने संकुचितपणा दाखवावा, हे पटण्यासारखे नाही; परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरे. भाजपप्रणीत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांसोबत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या अनेक माजी पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. तथापि, रालोआतील काही नेत्यांची सुरक्षा वाढवून केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे.
माजी माहिती आणि नभोवाणीमंत्री मनीष तिवारी, माजी कोळसामंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांची ‘झेड’ सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माजी पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची सुरक्षा कमी करून त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
रिता बहुगुणा, जतीन प्रसाद, पी. एल. पुनिया, आरपीएन सिंग आणि सलीम शेरवानी यांनाही सुरक्षेला मुकावे लागणार आहे.
बसपाचे ब्रजेश पाठक, धनंजय सिंग यांनाही झेडऐवजी वाय सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. अतिमहत्त्वाच्या जवळपास २० व्यक्तींची सुरक्षा एकतर पूर्णत: काढण्यात आली किंवा कमी करण्यात आली आहे. यात अमेठी आणि रायबरेलीतील दोन काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांचाही समावेश आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना सुरक्षा दिली होती.
सत्तेत आल्यानंतर रालोआने भाजप आणि भाजपशीसंबंधित असलेल्या व्यक्तींना सर्रास सुरक्षा देण्याचा सपाटा लावला.
मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा हे भाजपचे असल्याने त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. आधी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. दंगलीतील अन्य एक आरोपी संगीत सोम यांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांना आता एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोऐवजी सीआरपीएफ जवानांचे संरक्षण असेल.
लालू प्रसाद यादव यांची एनएसजी कमांडोजची सुरक्षा काढून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांवर सोपविली जाऊ शकते. तथापि, त्यांना दिल्ली आणि बिहारमध्ये ‘झेड’ सुरक्षा असेल. शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केलेले आरोपी मतंग सिंग यांना २१ राज्यात देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Former UPA minister unprotected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.