राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 21, 2020 07:37 PM2020-11-21T19:37:13+5:302020-11-21T19:41:52+5:30
माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादाला 'महामारी', असे म्हटले आहे. शशी थरूर यांचे नवे पुस्तक 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग'च्या प्रकाशनदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, सध्या आपला देश 'प्रकट आणि अव्यक्त' विचार तथा विचारधारांच्या धोक्यातून जात आहे. यात देशाला 'आपण आणि ते' या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा -
माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे. शिया धर्मगुरू म्हणाले, आपल्या देशात कट्टरता नाही. आपला देश एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे हिंदू, मुस्लीम,शीख,ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी लोक एकत्रित राहतात. माझा देश एखाद्या पुष्पगुच्छा प्रमाणे आहे.
हामीद अन्सारी यांना बोलायचेच होते, तर त्यांनी कुण्या एका व्यक्तीवर बोलायचे होते. संपूर्ण देशाला आपल्या बोलण्यात सामील करायचे नसते. येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हिंदू, मुसलमान, शीख सर्वच भावांनी रक्तत सांडले आहे. हामीद अन्सारी हे काय म्हणत आहेत, की आपल्या संपूर्ण देशात कट्टरतेचे वातावरण आहे? मात्र, असे नाही. आपल्या देशात कसल्याही प्रकारचे कट्टरतेचे वातावरण नाही. कारण येथे हिंदूंचा दरवाजा मुसलमानांच्या दरवाज्याला लागून आहे. तसेच मुसलमानांचा दरवाजाही हिंदू भावांच्या दरवाजाला लागून आहे. येथे नातलग नंतर उभे राहतात, आधी मित्र आणि जिवाभावाचे लोक उभे राहतात.
आणखी काय म्हणाले होते अन्सारी -
चार वर्षांच्या अल्पावधीतच, भारत उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे वाटचाल करत आहे. जी सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे कार्यरत आहे. कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे.” धार्मिक कट्टरपणा आणि कट्टरपंथी राष्ट्रवादाच्या तुलनेत. देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे असं हमीद अन्सारी म्हणाले.
फारूक अब्दुल्लांनीही घेतला होता चर्चेत भाग -
या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले, "१९४७मध्ये आम्हाला पाकिस्तानबरोबर जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांना आणि इतरांना असे वाटले की, दोन राष्ट्रांचे तत्त्व आमच्यासाठी चांगले नाही. सध्याचे सरकार ज्या दृष्टीने देशाकडे पाहत आहे, त्याला कधीही स्वीकारणार नाही.