BJP-PDP Alliance: भाजपासोबत सत्ता संचालन म्हणजे विष प्राशन करणं- मेहबूबा मुफ्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:26 PM2018-07-30T14:26:42+5:302018-07-30T14:29:38+5:30
मुफ्ती यांची भाजपावर पुन्हा जोरदार टीका
श्रीनगर : भाजपासोबत आघाडी करणं म्हणजे विष प्राशन करण्यासारखं होतं, असं जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी म्हटलं आहे. भाजपासोबत सत्ता राबवताना मोठा त्रास सहन करावा लागला, असंही त्या म्हणाल्या. भाजपानं दीड महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुफ्ती यांनी अनेकदा भाजपावर शरसंधान साधलं आहे.
भाजपासोबत आघाडी करणं सर्वात मोठी चूक होती, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. भाजपासोबत सत्ता राबवणं विष प्राशन करण्यासारखं होतं, असंही त्या म्हणाल्या. 'मुफ्ती साहेब भाजपाशी हातमिळवणी करण्यास तयार झाले, कारण वाजपेयी यांच्या सरकारसोबत आमचे चांगले संबंध होते. त्यामुळेच आम्ही हा मोठा निर्णय घेतला. भाजपासोबत आघाडी सरकार स्थापन करणं म्हणजे विष प्राशन करण्यासारखं होतं. दोन वर्ष दोन महिने आम्ही आघाडीत राहून बरंच काही गमावलं,' असं मुफ्ती यांनी म्हटलं.
Mufti Sahab agreed to join hands with BJP again because we had a good alliance during Vajpayee ji reign.But this time,it was a difficult decision.Forming an alliance with BJP was like drinking poison.I suffered during the 2 years 2 months of alliance: Mehbooba Mufti,former J&K CM pic.twitter.com/rAAyCHNBMD
— ANI (@ANI) July 30, 2018
भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यामुळे 18 जूनला मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर मुफ्ती यांच्यासह पीडीपीच्या अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखल्या नाहीत, तर देशाची पुन्हा एकदा फाळणी होईल, असं वादग्रस्त विधान पीडीपीचे नेते मुजफ्फर हसन बेग यांनी केलं होतं. गाय-म्हैशींच्या नावाखाली होणाऱ्या मुस्लिमांच्या हत्या थांबल्या नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असं बेग म्हणाले होते.