65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून तिढा; अमित शाह म्हणाले, आपसात ठरवा, मगच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 09:09 AM2022-07-30T09:09:26+5:302022-07-30T09:11:56+5:30
कानोकानी खबर लागू न देता मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्याशी मध्यरात्री चर्चा करून ते मुंबईत परतले होते
मुंबईः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन शनिवारी एक महिना होत असला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघत नाही. महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता विस्तारसूत्रे हातात घेतली असल्याचे चित्र आहे. वाटाघाटींनंतर भाजपाला २७ आणि शिंदे गटाला १५ मंत्रिपदे मिळू शकतात. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश आहे.
कानोकानी खबर लागू न देता मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्याशी मध्यरात्री चर्चा करून ते मुंबईत परतले होते. या भेटीत शिंदे यांनी गृह, वित्त व नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या चार महत्त्वाच्या खात्यांपैकी किमान तीन खाती आपल्या गटाला मिळावीत, अशी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना असे सुचविले आहे की, नगरविकास खाते हे शिंदेंकडे द्यावे, पण गृह व वित्त खाते आपल्याकडेच ठेवावे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या खात्यांचा तिढा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विस्ताराने चर्चा करावी, असे अमित शाह यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४२ सदस्य असू शकतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगळता ४० मंत्री उरतात. त्यापैकी २६ भाजपाला, तर १४ शिंदे गटाकडे जाऊ शकतात. एखादे मंत्रिपद कमी-जास्तही होऊ शकेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये जी खाती शिवसेनेकडे होती, ती शिंदे गटाने घ्यावीत, असा प्रस्ताव भाजपाने दिला होता. त्या परिस्थितीत नगरविकास, उद्योग, परिवहन अशी महत्त्वाची खाती शिंदेंकडे राहिली असती, पण, शिंदे गटाने हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असल्याने आता त्यांच्या गटाने खूप जास्त मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती यासाठी आग्रही राहू नये, अशी भूमिका भाजपाकडून घेतली जात असल्याचे म्हटले जाते.
एकूण मंत्रिपदे - ४२
मुख्यमंत्रिपद - उपमुख्यमंत्रिपद सोडून - ४०
६५:३५ च्या फॉर्म्युल्यानुसार - भाजपा २६, शिंदे गट १४