आता टॉमी, जिमी, ट्विटर यांचाही विमान प्रवास; DGCA आणणार नवी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:11 AM2023-01-19T06:11:43+5:302023-01-19T06:13:32+5:30
पाळीव प्राण्यांसाठी धोरण तयार करा, डीजीसीएचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यापुढे विमानाने प्रवास करताना तुम्हाला तुमच्या लाडक्या टॉमी, जिमी, ट्विटर अशा कुत्रे किंवा मांजरालाही सोबत घेऊन प्रवास करता येणार आहे. पाळीव प्राण्यांना घेऊन विमान प्रवास करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. तसेच, या संदर्भात जे काही धोरण विमान कंपनी निश्चित करेल ते वेबसाइटवर ठळकपणे प्रसिद्ध करावे, अशी सूचनाही डीजीसीएने केली आहे.
विमानातून पाळीव प्राण्यांना प्रवास करण्यासंदर्भात जागतिक पातळीवर कोणतेही धोरण नाही. केवळ यूएस रेग्युलेटर फेडरल अँडमिनिस्ट्रेटरने आपल्या विमान कंपन्यांना पाळीव प्राण्यांसंदर्भात धोरण निश्चित करण्याची मुभा दिली आहे. यानंतर भारत हा आता याबाबतीत जगातील दुसरा देश ठरणार आहे. अलीकडच्या काळात अनेक प्रवासी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करण्यासाठी आग्रही असतात. अशावेळी विमान कंपन्यांच्या निश्चित धोरणाअभावी विमान कंपन्या संबंधित प्रवाशाला विमानातून पाळीव प्राणी नेण्यास मज्जाव करतात. मात्र, लोकांचा वाढता कल लक्षात घेता ही सुविधा देण्यासाठी या संदर्भात धोरण बनविण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत.
यानंतर विमानाचा आकार, ज्या मार्गावर विमाने उड्डाण करतात, त्यांचा विचार करून विमान कंपन्या आपले धोरण निश्चित करतील. विशेष म्हणजे, विमान कंपन्यांनी हे सर्वंकष धोरण मांडले की, पाळीव पक्षी, सरपटणारे प्राणी असेही सोबत घेऊन प्रवास करणे लोकांना शक्य होणार आहे.
सद्य:स्थिती काय?
- सद्य:स्थितीत एअर इंडिया आणि अकासा एअर या दोनच कंपन्या प्राण्यांना नेण्याची परवानगी देतात.
- अन्य विमान कंपन्यांमधून जर प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करायचा असेल तर त्या प्राण्यांचे वजन करून त्यांना एका पिंजऱ्यात ठेवले जाते.
- मात्र, पाळीव प्राणी हा घरच्या सदस्यासारखा आहे, त्यामुळे आमच्याचसोबत तो प्रवास करेल या संदर्भात लोक आग्रही असतात.
आमच्या पाळीव प्राण्यांसोबत आम्हाला विमानातून प्रवास करायचा आहे अशी विचारणा आम्हाला नियमितपणे होत असते. त्यामुळे जर असे सर्वंकष धोरण येणार असेल तर या उद्योगातील आम्ही सर्व व्यावसायिक या नव्या धोरणाचे स्वागत करतो. - मंदार भारदे, विमान व्यावसायिक