केरळमधला बेरोजगार तरुण रातोरात झाला कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 09:42 AM2018-07-05T09:42:08+5:302018-07-05T09:42:30+5:30
केरळमध्ये एका नागरिकाचं नशीब फळफळलं आहे. एका रात्रीत ती व्यक्ती कोट्यधीश झाली आहे.
अलप्पुझा- केरळमध्ये एका नागरिकाचं नशीब फळफळलं आहे. एका रात्रीत ती व्यक्ती कोट्यधीश झाली आहे. केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला चक्क 13 कोटींची लॉटरी लागली आहे. कुट्टुनादमधला स्थानिक रहिवासी तोजो मैथ्यू(30)नं मित्रांच्या मदतीनं लॉटरीचं तिकीट काढलं होतं. ज्याचा नंबर 075171 होता. तोजोनं लॉटरीच्या माध्यमातून सात मिलियन दिरहम(यूएईची करन्सी) म्हणजे भारतीय चलनातील 13 कोटी 10 लाख 45 हजार 144 रुपये जिंकले आहेत.
तोजो हा अबुधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्यानं हल्लीच नोकरी सोडली होती. 24 जून रोजी भारत येण्याआधी त्यानं अबूधाबीच्या एअरपोर्टवर लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. तोजोला लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 18 मित्रांनी मदत केली होती. तोजो रातोरात कोट्यवधी झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. तोजोची आई कुंजम्मा सांगते, मला तीन मुलं आहे. त्यातील तिजो हा रिक्षाचालक आहे. तोजो आणि टिट्टो अबूधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर आहेत. तिघांचंही लग्न झालं आहे. तोजोचं पहिल्यापासून इथं एक घर बनवण्याचं स्वप्न होतं. परंतु त्याच्याजवळ पैसे नव्हते. पती मैथ्यू यांना म्हणाले होते की, जर तोजो लॉटरी जिंकला तर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्याचं ते स्वप्न सत्यात उतरलं. देवाच्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे, मी त्यांचे आभार मानते. तोजोनं या लॉटरीद्वारे 1 लाख दिरहम जिंकले आहेत. तत्पूर्वी भारतीय वंशाच्या एका टॅक्सीचालकानं एप्रिलमध्ये अबूधाबीत लॉटरीच्या माध्यमातून 12 मिलियन दिरहम जिंकले होते.