योगी दिलदार मुख्यमंत्री, पण एका गोष्टीत खूपच कंजूष... असं का म्हणाले राजनाथ सिंह? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 07:26 PM2021-12-26T19:26:19+5:302021-12-26T19:26:39+5:30
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनऊमध्ये ब्रह्मोस मिसाईल युनिट, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) लॅबच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
लखनऊ-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनऊमध्ये ब्रह्मोस मिसाईल युनिट, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) लॅबच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधित करताना आम्ही ब्रह्मोस मिसाईल जगातील कोणत्याही देशावर आक्रमण करण्यासाठी बनवत नसल्याचं म्हटलं. भारताकडे अशी ताकद असावी की जगातील कोणत्याही देशानं वाईट इराद्यानं आपल्याकडे पाहता कामा नये, याच उद्देशातून सक्षम होण्यासाठी आपण मिसाइल निर्मितीत वाढ करत आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं तोंडभरुन कौतुक केलं. "योगी एक दिलदार मुख्यमंत्री आहेत. पण ते एका गोष्टीत खूप कंजूष आहेत. ते माफियांना अगदी काडीचीही सवलत देत नाहीत. राज्यातील सर्व माफियांवर बुलडोजर चालवत आहेत. इथं गुन्हेगारांची नव्हे, तर बुलडोजरवाल्यांची बल्ले-बल्ले आहे", असं म्हणत राजनाथ सिंह यांनी योगींच्या कामाचं कौतुक केलं.
"ज्या डिफेन्स कॉरिडोअरबाबत केवल चर्चा व्हायच्या आता २०१८ पासून देशात दोन डिफेन्स कॉरिडोअर घोषीत झाले आहेत. मला आनंद आहे की संरक्षण मंत्री यांनी विशेष पुढाकार घेऊन उत्तर प्रदेशात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडोअरचा वेग वाढवला आहे", असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
भारत जगाला नेहमीच मैत्री आणि करुणेचा संदेश देत आला आहे. आम्ही मैत्री, करुणा आणि शांतीचा संदेश मानवतेच्या कल्याणाचा विचार करुन देतो याचा अर्थ देशातील १३० कोटी जनतेच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणं असं अजिबात होत नाही, असंही योगी यावेळी म्हणाले.