चारधाम महामार्गाची मोदींच्या हस्ते पायाभरणी
By admin | Published: December 28, 2016 02:30 AM2016-12-28T02:30:51+5:302016-12-28T02:30:51+5:30
गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र तीर्थांची यात्रा सुकर व आरामदायी करण्यासाठी रस्ते विकासाची मोठी योजना आखण्यात आली असून, त्याची पायाभरणी मंगळवारी
डेहराडून : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र तीर्थांची यात्रा सुकर व आरामदायी करण्यासाठी रस्ते विकासाची मोठी योजना आखण्यात आली असून, त्याची पायाभरणी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली.
उत्तराखंडला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार असल्याचे सांगतानाच, राज्यातील युवकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, असा शब्दही मोदी यांनी दिला. नऊ हजार किमीच्या या महामार्गांसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गामुळे देशातील वृद्ध भाविक नितीन गडकरी यांना धन्यवाद देतील, अशी स्तुतीही मोदींनी केली.
मोदी म्हणाले की, ‘उत्तराखंडच्या डोंगरी भागात असे म्हटले जाते की, येथील पाणीसाठे आणि युवक येथील भूमीची सेवा करू शकत नाहीत. मात्र, हा पायंडा आपण चुकीचा ठरवणार आहोत. येथील लोक परिस्थितीमुळे शहरात जातात आणि खडतर जीवन अपरिहार्यपणे स्वीकारतात. ही परिस्थिती आम्ही आता बदलणार आहोत.’
उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्याचा शब्द मोदी यांनी दिला. राज्याला या समस्यातून बाहेर काढण्यासाठी दुहेरी इंजिनाची गरज आहे. यातील एक केंद्रात तर दुसरे राज्यात असेल, असेही ते म्हणाले.
२०१३ मध्ये आलेल्या आपत्तीत चारधाम परिसरात मोठे नुकसान झाले होते. उत्तराखंडमधील मदत निधीतील कथित घोटाळ्याकडे इशारा करून ते म्हणाले की, ‘पाच लीटर इंधन क्षमता असलेली स्कूटरसुद्धा ३५ लीटर इंधन पिऊ शकते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार सत्तेवर आणा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतील उत्तराखंड निर्माण करण्यासाठी संधी द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)