चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र हरपला; सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:01 AM2021-05-22T07:01:07+5:302021-05-22T07:01:28+5:30
१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले.
नवी दिल्ली : बहुगुणा यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वन अधिकारी होते. १३ वर्षांचे असताना अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. सुमन यांच्यापासून प्रेरणा घेत ते बाल्यावस्थेत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यांनी टिहरी राजवटीविरोधात आंदोलन केले. अत्यंत बुद्धिमान असलेले बहुगुणा यांचे शिक्षण टिहरीतील राजकीय प्रताप इंटर काँलेजपासून ते लाहोरपर्यंत झाले.
१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले. १४ जानेवारी, १९४८ रोजी राजेशाही उलथून टाकली गेल्यावर ते प्रजामंडळ सरकारमध्ये प्रचार मंत्री बनले. लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुगुणा यांनी १९८१ मध्ये झाडे तोडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी पदमश्री सन्मान घेण्यास नकार दिला. त्यांनी दारूबंदी, पर्यावरण संरक्षण आणि टिहरी धरणाविरोधात १९८६ मध्ये आंदोलन सुरू करून ७४ दिवस उपोषण केले.
पर्यावरणवादी युगाचा अंत -राहुल गांधी
सुंदरलाल बहुगुणा यांना त्यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढ्या नेहमी लक्षात ठेवतील, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गांधी यांनी टेलिग्राम संदेशात म्हटले की, “बहुगुणा यांच्या निधनामुळे देशातील सगळ्यात प्रतिष्ठित पर्यावरणवादी युगाचा अंत झाला आहे. चिपको आंदोलनातील त्यांचे योगदान आगामी पिढ्या लक्षात ठेवतील.”
जागतिक स्तरावर नोंद
सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी दु:ख व्यक्त केले. बहुगुणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नायडू ट्विटरवर म्हणाले. हिमालयातील पर्यावरण रचना जपण्यासाठी बहुगुणा यांनी न थकता केलेल्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. त्यांच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे नायडू म्हणाले.