चार अपघात; पाच ठार
By Admin | Published: December 22, 2016 11:14 PM2016-12-22T23:14:37+5:302016-12-22T23:16:59+5:30
बीड/आष्टी : मागील २४ तासांत जिल्ह्यात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघांना आपला प्राण गमवावा लागला.
बीड/आष्टी : मागील २४ तासांत जिल्ह्यात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघांना आपला प्राण गमवावा लागला. आष्टी तालुक्यात दोन, तर बीड व नेकनूर येथे प्रत्येकी एक अपघात झाला.
अहमदनगर-बीडच्या सीमेवरील चिंचपूर गावाजवळ गुरूवारी पहाटे दुचाकी (क्र. एमएच-२३ एच-७९१८) ला ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-२६ एन-९७३०) ने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दादा विठ्ठल कदम (४७, रा.ढाळेवाडी ता.पाटोदा) व कैलास सदाशिव अडागळे (४२, रा.पाटोदा ता.पाटोदा) हे दोघे जागीच ठार झाले. ट्रॅव्हल्स चालक नवनाथ शेंडकर (रा. घाटकोपर, मुंबई) याला अटक केली आहे. पुढील तपास फौजदार मेघानाथ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.गणेश राठोड व ए.आर.राऊत हे करीत आहेत.
बीड तालुक्यातील नेकनूर येथे शेख जिलानी बेगम शेख अहमद (७०, रा. नेकनूर) ही महिला आपल्या घरासमोर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उभी होती. गावातीलच मालवाहू जीप (क्र. एमएच-१४ एएच-६३३) ने तिला पाठीमागून धडक दिली. यात ती जागीच कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेकनूर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
बार्शी नाक्याजवळ एक ठार
बीड शहरातील बार्शी नाक्यावरील परळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे ६५ आहे. तो रस्त्याने पायी जाताना वाहनाने पाठीमागून उडवले. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. पेठ बीड ठाण्यात नोंद आहे. (प्रतिनिधी)