कर्नाटकात भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी "
By admin | Published: May 1, 2017 03:45 AM2017-05-01T03:45:40+5:302017-05-01T03:45:40+5:30
कर्नाटक भाजपमधील भांडणे विकोपाला जाण्याआधीच कारवाई करीत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष बी.एस. येदीयुरप्पा व ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा
बंगळुरू : कर्नाटक भाजपमधील भांडणे विकोपाला जाण्याआधीच कारवाई करीत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष बी.एस. येदीयुरप्पा व ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा गटाच्या प्रत्येकी दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. या कारवाईवर पक्षात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
पक्षाचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी मुरलीधर राव यांनी काल व आज पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही कारवाई केली. येदीयुरप्पा व ईश्वरप्पा गटांनी २७ एप्रिल रोजी परस्परांना आव्हान दिल्यानंतर मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भानुप्रकाश व निर्मलकुमार सुराणा, रयत मोर्चा उपाध्यक्ष एम.पी. रेणुकाचार्य व प्रवक्ते जी. मधुसूदन यांना त्यांच्या जबाबदारीतून तातडीने मुक्त करण्यात आले. भानुप्रकाश व सुराणा हे ईश्वरप्पांचे जवळचे आहेत, तर रेणुकाचार्य व मधुसूदन हे येदीयुरप्पा गटाचे असून, त्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. भाजपच्या कर्नाटक शाखेत घडत असलेल्या घडामोडींवर केंद्रीय नेतृत्व बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे पक्षाचे अन्य एक सरचिटणीस अरविंद लिंबावली यांनी सांगितले. दरम्यान, ईश्वरप्पा हे मुरलीधर राव यांची आज भेट घेणार होते. मात्र, त्यांनी ही भेट टाळली आहे.