Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 07:09 PM2023-05-05T19:09:54+5:302023-05-05T19:10:35+5:30

एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण

Four brothers are MLAs from the Jarkiholi family of Belgaum district | Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

googlenewsNext

राम मगदूम 

बेळगाव : पक्ष कुठलाही असू द्या, परंतु, 'सावकर' हमखास निवडून येणारच अशीच ख्याती बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी बंधूंची आहे. तिघे सख्खे भाऊ यावेळीही रिंगणात आहेत. त्यापैकी दोघे भाजपतर्फे, तर एकटा 'काँग्रेस'कडून लढत आहे. धाकटा सध्या कर्नाटकच्या विधानपरिषदेवर आहे. एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण आहे. यावेळीही सगळे निवडून येणारच, अशीच चर्चा बेळगावसह सीमाभागात आहे.

माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सर्वांत ज्येष्ठ. १९९९ मध्ये ते काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते सलग ५ वेळा निवडून आले आहेत. यावेळी ते गोकाकमधून सहाव्यांदा रिंगणात आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’मध्ये राज्यातील १५ आमदारांच्या बंडाचे नेतृत्व त्यांनीच केले होते. परिणामी, 'काँग्रेस'च्या सिद्धरामय्यांचे सरकार जाऊन भाजपच्या येडियुराप्पांचे सरकार पुन्हा सत्तेत आले. त्याबदल्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. परंतु, तथाकथित सीडी प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले.

माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी हे २००४ मध्ये जनता दल-धर्मनिरपेक्षकडून पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते सलग चारवेळा निवडून आले. यावेळी ते आरभावीमधून पाचव्यांदा रिंगणात आहेत. जनता-दल भाजप युतीच्या कुमारस्वामींच्या सरकारमध्ये सहकार व पणनमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ मध्ये भाजपच्या ऑपरेशन कमळमध्ये त्यांनी जदच्या आमदारकीचा राजीनामा दिला व पोटनिवडणुकीत भाजपतर्फे पुन्हा निवडून आले.

माजी मंत्री व कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे २००८ मध्ये यमकनमर्डीमधून पहिल्यांदा विजयी झाले. तेव्हापासून सलग तीनवेळा ते निवडून आले. ही त्यांची चौथी निवडणूक आहे. दरम्यान, जनता दलातर्फे विधानपरिषदेवर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये ते अबकारी खात्याचे मंत्री होते.

आमदार लखन जारकीहोळी हे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे कनिष्ठ बंधू. २०२१ मध्ये ते विधानपरिषदेवर अपक्ष निवडून आले आहेत. परंतु, सध्या तेदेखील भाजपमध्येच सक्रिय आहेत. एकंदरीत गेल्या दोन दशकांपासून जारकीहोळी कुटुंबातील तिघांची आमदारकी विशेष चर्चेत असून, लखन यांच्या रूपाने चौथ्याची भर पडली आहे.

Web Title: Four brothers are MLAs from the Jarkiholi family of Belgaum district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.