चार मुलं, कोट्यवधींची संपत्ती, तरीही वृद्धाश्रमात… डोळ्यात अश्रू आणेल ८७ वर्षीय आईची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:10 AM2023-04-06T09:10:01+5:302023-04-06T09:11:21+5:30
एकेकाळी कोट्यधीशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील ८७ वर्षीय महिलेला आज वृद्धाश्रमात राहावं लागत आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकेकाळी कोट्यधीशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील ८७ वर्षीय महिलेला आज वृद्धाश्रमात राहावं लागत आहे. महिलेला चार मुलगे असून चौघांचीही कोट्यवधींची मालमत्ता आहे. असं असतानाही अनेक महिने या वृद्ध महिलेला दारोदार चकरा माराव्या लागत होत्या. त्या आईला त्यांची मुलं आणि सून सोबत ठेवायला तयार नाहीत.
विद्या देवी असं या वृद्ध महिलेचे नाव असून, आग्रा येथील प्रख्यात नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या त्या पत्नी आहेत. गोपीचंद यांची गणना शहरातील कोट्यधीशांमध्ये होते. विद्या देवी आपल्या चार मुलांसह आलिशान घरात राहत होत्या. त्यांनी चारही मुलांना पायावर उभं करून सर्वांचं लग्न लावून दिले. १३ वर्षांपूर्वी गोपीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आणि हळूहळू विद्या देवी याचं आयुष्यही बदलू लागले. मुलांनी मालमत्ता वाटून घेतली पण वृद्ध आईला काहीच मिळालं नाही.
घरातून काढलं
विद्या देवी काही दिवस मोठ्या मुलाकडे राहिल्या, पण त्यांना सतत सूनेचे टोमणे ऐकावे लागत होते. त्यामुळे त्या आपल्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागल्या. त्यानंतर ती तिसऱ्या आणि चौथ्या मुलासोबत राहू लागल्या. काहींनी कपड्याला दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं तर काहींनी ते यमुनेत फेकून देण्याचं सांगितलं. यानंतरही विद्या देवी घराबाहेर पडल्या नाहीत, तेव्हा मुलानं वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढलं.
वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडलं
विद्यादेवी यांचे नातेवाईक अग्रवाल महिला मंचच्या अध्यक्षा शशी गोयल यांना ही बाब समजताच त्यांनी विद्यादेवीच्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी शशी गोयल यांनी विद्या देवी यांना रामलाल वृद्धाश्रमात आणलं. आता विद्या देवी वृद्धाश्रमात राहत आहेत. आश्रमातील वृद्ध विद्यादेवींची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे आश्रम व्यवस्थापकानं सांगितलं.