विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:56 AM2020-01-30T01:56:53+5:302020-01-30T01:57:39+5:30
विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात त्रस्त केल्याबद्दल आणखी दोन कंपन्यांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा याच्यावर पुढील सूचनेपर्यंत हवाई प्रवास बंदी घातली आहे. मंगळवारी इंडिगो कंपनीने कामरावर सहा महिन्यांसाठी हवाई प्रवास बंदी घातली, तर एअर इंडियाने पुढील सूचनेपर्यंत बंदी घातली आहे. दरम्यान, विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे.
बुधवारी स्पाईस जेट आणि गोएअर या कंपन्यांनी कुणाल कामरावर पुढील सूचनेपर्यंत हवाई प्रवासासाठी बंदी घातली. एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीची अंतर्गत समिती या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर कारवाई करील. विस्तारा या कंपनीनेही असे निवेदन जारी केले.
दरम्यान, डीजीसीएने स्पष्ट केले की, विमानसेवा क्षेत्रातील चार कंपन्यांची कामरावर घातलेली बंदी नियमानुसार आहे. उपद्रवी किंवा हानिकारक प्रवाशांसाठीच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या २०१७ च्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाने शाब्दिक हल्ला केल्यास, त्याच्यावर विमानसेवा क्षेत्रातील कंपनी अंतर्गत समितीचा निर्णय होईपर्यंत बंदी घालू शकते. तथापि, नियमानुसार शाब्दिक हल्ल्याच्या प्रकरणात अंतर्गत समिती तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ संबंधित प्रवाशांवर बंदी घालू शकत नाही. इंडिगोने बंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, या घटनेची दखल घेऊन इतर कंपन्यांनाही कामरावर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.