चार दलित खासदारच मोदींच्या विरोधात? चौघेही जण उत्तर प्रदेशातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:16 AM2018-04-08T00:16:44+5:302018-04-08T00:16:44+5:30
मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल घेतलेली उदासीन भूमिका व एकूणच हिंदुत्वाबाबत भाजपाच्या अनेक नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाचे किमान चार खासदार संतप्त दिसत आहेत. उत्तर प्रदेश भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
लखनौ : मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल घेतलेली उदासीन भूमिका व एकूणच हिंदुत्वाबाबत भाजपाच्या अनेक नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाचे किमान चार खासदार संतप्त दिसत आहेत. उत्तर प्रदेश भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
सावित्रीबाई फुले (बहराईच), छोटेलाल खरवार (रॉबर्ट्सगंज) अशोक कुुमार दोहरे (इटावा) आणि यशवंत सिंग (नगिना) या चार खासदारांनी आपली नाराजी वा संताप लपवून न ठेवता जाहीरपणे व्यक्त केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत भाजपा संवेदनशील नसून, आरक्षण रद्द करण्याची भाषणा काही नेते करीत असल्याने हे खासदार अस्वस्थ आहेत. यांच्यापैकी एका खासदाराने तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपला अपमान करतात, अशी थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ज्याप्रकारे देशभरातील दलित समाज एकत्र आला, त्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी स्वपक्षावरच टीका केली आहे. सर्वात आधी आवाज उठवला सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी अॅट्रॉसिटी कायदा व आरक्षणाबाबत मत व्यक्त करताना, भाजपाचे अनेक नेते राज्यघटना बदलण्याची भाषा करीत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘भारतीय संविधान और आरक्षण बचाव’ मेळावाही घेतला. या मेळाव्यामुळेच भाजपामध्ये सर्व ठिकठाक चालले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर बंडाचा झेंडा उचलत छोटेलाल खरवार यांनी योगी आदित्यनाथ जातीच्या आधारे भेदभाव करतात, असा आरोप केला. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगापर्यंत तक्रार पोहोचवली. उत्तर प्रदेश भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष असलेल्या खरवार यांच्या पत्राने वातावरण आणखी बिघडले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अधिकृत कागदोपत्री भीमराव रामजी आंबेडकर करण्याच्या आदित्यनाथ सरकारच्या निर्णयाला अशोक कुमार दोहरे यांनी आक्षेप घेतला. राज्यातील पोलीस दलितांविषयी वाईट भाषेत बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनीही तक्रार पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली. पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाटव समाजाचे नेते खा. यशवंत सिंग यांनीही मोदी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी व पक्षाने २0१४ साली दलितांना तसेच बेराजेगारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याची टीका केली. तसेच देशात दलितांची संख्या ३0 कोटी असून, त्यांना दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
दलित समाजापासून तुटण्याची भीती
पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत सपा व बसपा यांनी एकत्र येऊ न भाजपाचा पराभव केल्याने दलित व मागासवर्गीय वेगळा विचार करू लागले आहेत, याची खात्री भाजपाच्या या चार खासदारांना पटली आहे. अशा वेळी आपण पक्षाचीच बाजू मांडत राहिलो, तर समाज आपल्यापासून तुटेल, याचा अंदाज त्यांना आला असावा, असे दिसते. त्यामुळेच हे चौघे आक्रमक झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आणखी काही दलित खासदार व आमदार नाराजी व्यक्त करू लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.