मॉकपोलसह मतदान घेतल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:07 PM2019-04-22T17:07:56+5:302019-04-22T17:09:11+5:30
डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले.
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेअंतर्गत डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणात अखेर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, या मतदान केंद्रावर २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येत असून त्यासाठी राखीव कोट्यातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव ईव्हीएम मशीनचा यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
निलंबीत करण्यात आलेल्यामध्ये केंद्राधिकारी तथा नांदुरा येथील कोठारी हायस्कूलवर असलेले सहाय्यक शिक्षक नंदकिशोर लागे, चिखली येथील तक्षशिला हायस्कूलवरील कनिष्ठ लिपीक किशोर देशमाने, खामगाव बाजार समितीमधील कनिष्ठ लिपीक जे. पी. अमालकर आणि बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू हायस्कूलमधील शिक्षक अब्दुल नईम शेख अब्दुला यांचा समावेश आहे. जिल्हाधिकार्यांनी एका आदेशानुसार त्यांचे निलंबन केले असल्याचे सुत्रांनी सांगितले. निलंबन काळात संबंधितांचे मुख्यालय कोणते राहणार ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या मॉक पोलसह मतदारांचे मतदान १८ एप्रिल रोजी घेण्यात आले होते. ही चूक जवळपास एक तासाने निदर्शनास आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला केला होता. मात्र निवडणूक आयोगाने ठरून दिलेल्या प्रक्रियेचे यात पालन झाले नाही. त्यामुळे कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रश्नी निवडणूक निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, रिंगणातील उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदानाच्या दुसर्या दिवशी १९ एप्रिल रोजी स्क्रुटनी केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला होता.
या प्रकरणी २१ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना अनुषंगी आदेश मिळाले होते. त्यानुसार २४ एप्रिल रोजी डोणगावच्या १२० क्रमांकाच्या या मतदान केंद्रावर फेर मतदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. प्रकरणी राज्याचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पत्र आले होते. दरम्यान २२ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी उपरोक्त चौघांना निलंबीत केले आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फेरमतदााची तयारी अंतिम टप्प्यात
डोणगाातील या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी दुपारी चार वाजता राखीव बॅलेट, कंट्रोल युनीट आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ करण्यात येऊन त्यातून या केंद्रासाठी यंत्रणे निवडण्यात आली आहेत. सोबतच राखीव कोट्यातील कर्मचार्यांचे एक पथक येथे फेरमतदान घेण्यासाठी पोहोचणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत फेरमतदान होईल.
फेरमतदानाच्या टक्केवारीबाबत उत्सूकता
या केंद्रावर आता फेरमतदान होत असल्याने त्यात प्रत्यक्ष किती टक्के मतदान होते याबाबत उत्सूकता लागून आहे. या मतदान केंद्रावर ५९६ मतदान असून त्यापैकी प्रत्यक्षात ६९ टक्के मतदान झाले होते. म्हणजेच ४९४ जणांनी मतदान केले होते. या केंद्रावर ३०३ पुरुष आणि २९३ स्त्री मतदार आहेत.