इसिसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या चार भारतीय युवकांना सीरियात अटक
By admin | Published: January 15, 2016 02:02 AM2016-01-15T02:02:58+5:302016-01-15T02:02:58+5:30
इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री वालिद अल मौअलेम यांनी बुधवारी ही माहिती दिली. हे चारही भारतीय युवक जॉर्डनमार्गे सिरियात घुसले होते आणि इसिसमध्ये सामील होण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली, असे मौअलेम यांनी सांगितले.
इसिसमध्ये सामील होण्याच्या हेतूने सिरियात आलेल्या या चारही भारतीयांना सध्या दमास्कसच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. सिरियात येऊन या युवकांना भेटा आणि त्यांना भारतात परत आणा, असे आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दहशतवादविरोधी आघाडीवर सहकार्य आणि गुप्तचर माहितीचे आदानप्रदान या दोन मुख्य हेतूंसाठी आपला हा भारत दौरा आहे,’ असे मौअलेम म्हणाले.
किमान २३ भारतीय, ज्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय आहे. सिरियात या चार युवकांना अटक झाल्यामुळे आता ही संख्या २७ वर पोहोचली. मौअलेम म्हणाले, ‘इराकमध्ये ३९ भारतीय इसिसच्या ताब्यात असल्याचा संशय आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी सिरिया तूर्तास तरी मदत करण्याच्या स्थितीत नाही. मला क्षमा करा. आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला इर्दोगान (तुर्की अध्यक्ष) यांना सांगावे लागेल.’
मौअलेम यांनी सिरियातील संकटासाठी तुर्की, सौदी अरेबिया आणि कतार या देशांना जबाबदार धरले. हे देश दहशतवादी गटांना पाठिंबा देत आहेत, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. इसिसविरुद्ध लढण्यासाठी सिरियाला लष्करी मदत केल्याबद्दल त्यांनी रशियाचे आभारही मानले. रशियाच्या लष्करी मदतीमुळेच आम्ही इसिसच्या ताब्यातील २० ठिकाणे मुक्त करू शकलो. ही मदत अशी सुरू राहिली तर त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील. अमेरिकेने जे १८ महिन्यांत मिळविले ते रशियाने अवघ्या तीन महिन्यांत मिळविले, असे मौअलेम म्हणाले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत झालेली चर्चा उपयुक्त ठरली. सिरियातील संकट हा आमच्या चर्चेचा विषय होता. दहशतवाद हा कुणा एका देशाचा नसतो, असे माझे मत आहे. जगात जे काही घडते आहे, त्याचा सिरियावरही परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)