काश्मिरात चार अतिरेक्यांचा खात्मा; उरीत तीन, शोपियांत एक जण टिपला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:50 PM2021-09-24T13:50:42+5:302021-09-24T13:52:55+5:30
अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका दुकानदारावर गोळी झाडली होती.
सुरेश एस. डुग्गर -
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले आहेत, तर अतिरेक्यांना मदत करणाऱ्या चार जणांना पकडण्यात आले आहे.
सैन्याने एलओसीनजीक उरीजवळ रामपूर सेक्टरमध्ये तीन अतिरेक्यांना ठार मारले. पाकव्याप्त काश्मिरातून हे अतिरेकी भारतीय हद्दीत आले होते. या अतिरेक्यांकडून पाच एके-४७, आठ पिस्तूल आणि ७० हातगोळे जप्त करण्यात आले आहेत. हे अतिरेकी रविवारी या भागात घुसले होते. पाच दिवसांच्या संघर्षानंतर त्यांना ठार मारण्यात यश आले आहे. कमांडर डी. पी. पांडे यांनी सांगितले की, रामपूर सेक्टरमध्ये गुरुवारी हाथलंगा जंगलात हालचाली दिसून आल्या. त्यानंतरच्या ऑपरेशनमध्ये तीन अतिरेकी मारले गेले.
अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका दुकानदारावर गोळी झाडली होती.
शस्त्रास्त्र साठा केला जप्त
- कुलगाम जिल्ह्यात अहरबलच्या त्रिनारी वन क्षेत्रात सुरक्षा दलाने अतिरेक्यांच्या एका जागेचा पर्दाफाश केला. येथे शस्त्र आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
- अतिरेक्यांच्या शोधासाठी तपास अभियान सुरू करण्यात आले आहे. उत्तर काश्मिरात बांडीपोरमध्ये अतिरेक्यांना मदत करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक लष्कर- ए- तोयबासाठी काम करत होते.