महिला हल्लाप्रकरणी आणखी चौघांना अटक
By Admin | Published: February 6, 2016 02:50 AM2016-02-06T02:50:13+5:302016-02-06T02:50:13+5:30
बंगळुरूयेथे गेल्या रविवारी एका टांझानियाच्या महिलेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी रात्री आणखी चार जणांना अटक केली. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे
बंगळुरू : बंगळुरूयेथे गेल्या रविवारी एका टांझानियाच्या महिलेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी रात्री आणखी चार जणांना अटक केली. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, विदेशी विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटक सरकारला केली आहे.
कार अपघातानंतर संतप्त जमावाने टांझानियाच्या महिलेला बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची घटना गेल्या रविवारी घडली होती. या प्रकरणी पाच जणांना गुरुवारीच अटक करण्यात आली होती. आता अटक झालेल्यांची संख्या नऊवर पोहोचल्याची माहिती बंगळुरूचे पोलीस आयुक्त एन.एस. मेघारीख यांनी दिली.
या प्रकारणी पोलीस निरीक्षक प्रवीण बाबू आणि कॉन्स्टेबल मंजुनाथ या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बाबू याला तर घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असतानाही कारवाई केली नाही म्हणून मंजुनाथला निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या चार जणांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध हल्ला करणे, बेकायदा एकत्र येणे, दंगल माजविणे आणि महिलेचा विनयभंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेला एक जण भाजपचा कार्यकर्ता आहे काय, असे विचारले असता, तो पंचायत सदस्य असल्याचे मेघारीख म्हणाले.
दरम्यान, विदेशी विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष पथक स्थापन करावे, अशी सूचना कायदामंत्री गौडा यांनी केली. काही विदेशी विद्यार्थ्यांच्या गैरव्यवहाराबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल गौडा यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.