प्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:07 AM2017-11-11T09:07:35+5:302017-11-11T09:08:54+5:30
प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे.
नवी दिल्ली - प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयने तपासाला वेग दिला असून, चार विद्यार्थी त्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान अधिकारी मात्र यासंबंधी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. यामधील एका विद्यार्थ्याची चौकशीही करण्यात आली आहे.
सीबीआय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयला इतर विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी संशय आहे. त्याच विद्यार्थ्याने मुख्य आरोपीसोबत मिळून शाळेच्या माळी आणि शिक्षकाला प्रद्युम्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली होती. प्रद्युम्न हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याची सलग तिस-या दिवशी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी इतर विद्यार्थ्यांशिवाय रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांना एक चाकू जप्त केला असून, तपासतील मुख्य पुरावा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सीबीआयने सांगितलं आहे की, प्रद्युम्न हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळा प्रशासन आणि आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक पोलिसांसोबत मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते का यादृष्टीनेही सीबीआय तपास सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्नच्या हत्येत सहभागी आरोपीची माहिती आधीच शाळा प्रशासनाला मिळाली होती. जर हे खरं असेल तर येणा-या दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरतील आणि अनेक जण सीबीआयच्या रडारवर असतील. अद्याप कोणालाही याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं सीबीआयने सांगितलं आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कंडक्टर अशोकची सुटका होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरु असताना अशोकची चौकशी होउ शकते, मात्र त्याच्या जामीनाला सीबीआय विरोध करणार नाहीये. जामीनाला विरोध करण्यासाठी सीबीआयकडे कोणतंही ठोस कारण नसल्याने विरोध करण्याचा प्रश्न येत नाही.
प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या सीबीआय तपासानंतर शाळेतीलच 16 वर्षीय विद्यार्थ्याने एका दुकानातून चाकू खरेदी करत प्रद्युम्नची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं होतं.