सुप्रीम कोर्टाच्या चार नव्या न्यायाधीशांचे शपथग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:39 AM2019-09-24T02:39:47+5:302019-09-24T02:39:56+5:30
कोरम झाला पूर्ण; दोन नवे न्याय कक्ष स्थापन
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नव्या न्यायाधीशांचा सोमवारी शपथग्रहण सोहळा झाला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ झाली असून, सर्व मंजूर पदे भरली आहेत.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. कृष्ण मुरारी, न्या. एस. रवींद्र भट्ट, न्या. व्ही. रामसुब्रमण्यन व न्या. ऋषिकेश रॉय यांना पदाची, तसेच गोपनीयतेची शपथ दिली. न्या. मुरारी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, न्या. भट्ट राजस्थान उच्च न्यायालय, न्या. रामसुब्रमण्यन हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय, तर न्या. रॉय केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. केंद्र सरकारने या चौघांच्याही नियुक्तीला गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ३० आॅगस्टला या चौघांच्याही नावाची शिफारस केली होती. सरन्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. काही दिवसांमध्ये केंद्र सरकारतर्फे नावांना मंजुरी देण्यात आली.
५९ हजार खटले प्रलंबित
केंद्राच्या विधि मंत्रालयाने यावर्षी ११ जुलैला राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयात ५९ हजार ३३१ खटले प्रलंबित आहेत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने खटल्यांच्या सुनावणीसाठी दोन अतिरिक्त न्याय कक्ष तयार केले असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात एक अधिसूचना काढून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने दोन अतिरिक्त कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालयात एकूण १७ न्याय कक्ष झाले आहेत.