‘चार चार जणांनी बलात्कार करणे प्रत्यक्षात शक्य नाही’
By Admin | Published: August 19, 2015 10:53 PM2015-08-19T22:53:17+5:302015-08-19T22:53:17+5:30
एखादी व्यक्ती बलात्कार करते; परंतु त्या प्रकरणात इतर चार जणांची नावेही ‘जुने हिशेब’ चुकते करण्यासाठी गोवली जातात. चार जणांनी बलात्कार करणे
लखनौ : एखादी व्यक्ती बलात्कार करते; परंतु त्या प्रकरणात इतर चार जणांची नावेही ‘जुने हिशेब’ चुकते करण्यासाठी गोवली जातात. चार जणांनी बलात्कार करणे हे प्रत्यक्षात शक्य नाही, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी म्हटले. यादव राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर येथील कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या वर्षी यादव यांनी फाशीच्या शिक्षेला विरोध करताना ‘मुले ही मुले असतात. त्यांच्याकडून चूक घडून जाते’ असे म्हटले होते. या विधानावरूनही मोठा वाद झाला होता.
यादव म्हणाले,‘‘उत्तर प्रदेशची लोकसंख्या विचारात घेता गुन्ह्यांचे प्रमाण फारच कमी आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत की प्रत्यक्षात एखाद्यानेच बलात्कार केलेला असतो; परंतु पीडित व्यक्ती जुने हिशेब पूर्ण करण्यासाठी इतर चार जणांची नावे त्यात घेते.’’ निर्दोष व्यक्तींना अडकविण्यात येऊ नये व त्यांना त्रासही दिला जाऊ नये, असेही यादव म्हणाले. एका पीडितेने बलात्कार प्रकरणात चार भावांना आरोपी केले. असे प्रत्यक्षात शक्य नाही, असे यादव यांनी मत व्यक्त केले. यासाठी यादव यांनी बदाऊं येथे दोन बहिणींवरील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा प्रचंड गाजावाजा झाला, असे सांगितले. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली व त्यात त्या दोघींवर बलात्कार झालेलाच नाही, असे आढळले. त्या दोघींचा त्यांच्या चुलत भावांकडून संपत्तीसाठी अतिशय शांतपणे खून करण्यात आला होता, असे स्पष्ट झाले. या प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे घटनास्थळी गेले व त्यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचा आरोप केला, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.(वृत्तसंस्था)