उष्माघाताने चार वयोवृद्ध प्रवाशांचा रेल्वेमध्येच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:26 AM2019-06-12T08:26:00+5:302019-06-12T08:26:24+5:30
केरळ एक्स्प्रेसमधील चार वयोवृद्ध प्रवासी उत्तर प्रदेशमधील कडक उन्हाळा सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले.
झाशी : केरळ एक्स्प्रेसमधील चार वयोवृद्ध प्रवासी उत्तर प्रदेशमधील कडक उन्हाळा सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले. त्यातील तीन जणांना रेल्वेगाडीतच मृत्यूने गाठले, तर चौथा प्रवासी झाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दगावला. मृतांमध्ये बालकृष्ण रामस्वामी (७० वर्षे), पी. कमला (७६), सुब्बरय्या (८०), धीवा नई यांचा समावेश आहे. हे कोइम्बतूरचे रहिवासी असून, आग्रा येथून ते रेल्वेने आपल्या घरी परतत होते. शवचिकित्सेनंतर या चौघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले.
रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोइम्बतूरहून ६७ पर्यटकांचा एक गट एस-आठ, एस-नऊ या डब्यांतून प्रवास करीत होता. त्यामध्ये हे चार जण होते. ग्वाल्हेरनजीक केरळ एक्स्प्रेस आली असताना या चौघांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ते रेल्वेतच बेशुद्ध पडले. ही घटना तिकीट तपासनीसाने झाशी नियंत्रण कक्षाला तात्काळ कळवून वैद्यकीय मदत मागवली. झाशी येथे डॉक्टरांनी या चार प्रवाशांची रेल्वेतच तपासणी केली आणि त्यातील तीन जण मरण पावल्याचे जाहीर केले. एका प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते. कडक उन्हाळा सहन न झाल्याने केरळ एक्स्प्रेसमधील चार प्रवासी मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवचिकित्सेच्या अहवालानंतरच नेमके कारण कळू शकेल, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
चार प्रवासी बेशुद्ध पडल्याचे समजताच तिथे सर्वप्रथम धाव घेणाऱ्यांमध्ये झाशीचे पोलीस उपनिरीक्षक विनय साहू होते. ते म्हणाले की, आग्रा येथून रेल्वेने प्रस्थान करताच वयोवृद्ध प्रवाशांना उन्ह सहन न झाल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबरोबर त्यांचे नातेवाईकही केरळ एक्स्प्रेसने प्रवास करीत होते.