पोस्टमार्टम अहवालातून 'शॉकिंग' खुलासा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 16:14 IST2019-11-29T16:08:01+5:302019-11-29T16:14:28+5:30
पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे

पोस्टमार्टम अहवालातून 'शॉकिंग' खुलासा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
हैदराबाद - हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियांकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजतंय. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही लक्ष घातले असून संबंधित अधिकाऱ्यांना हैदराबादला पाठविण्यात आलंय.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडित कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितीचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. मात्र, मधल्या काळात नेमकं काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.