मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी केला RPG हल्ला, पोलिसांचे चार कमांडो जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 07:46 PM2023-12-31T19:46:29+5:302023-12-31T19:46:56+5:30
Manipur News: गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर दबा धरून हल्ला केला. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये चार पोलीस कमांडो जखमी झाले. आरपीजी हल्ल्यापूर्वी ३० डिसेंबर रोजीही उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा पायांना दुखापत झाली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला.
रात्री सुमारे ११.४० च्या सुमारास संदिग्ध कुकी उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर आरपीजीद्वारे हल्ला केला. त्यानंतर उग्रवाद्यांनी मेरेह येथे तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल कारवाईमध्ये पोलिसांनीही गोळीबार केला. दोन्हीकडून रात्रभर गोळीबार सुरू होती, असे सांगण्यात येत आहे.
हल्लेखोरांनी विशेषकरून स्पेशल पोलीस कमांडोंची निवासस्थाने असलेल्या बराकींना लक्ष्य केले. त्यामुळे चार अधिकारी जखमी झाले. हे अधिकारी त्यांच्या क्वार्टरमध्ये आराम करत होते. हा हल्ला एवढा भयंकर होता की त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची श्रवणशक्तीच संपुष्टात आली.
मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यापासून मैतेई आणि कुकी समुदाय आमने-सामने आले आहेत. त्यामुळे उद्धभवलेल्या संघर्षात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.