चार शक्तिशाली स्फोटांनी आसाम हादरले, उल्फाने (आय) स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 06:10 AM2020-01-27T06:10:58+5:302020-01-27T06:15:01+5:30

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटरसायकलवर आलेले दोन युवक ग्रेनेड फेकून पळून गेल्याचे दिसत आहे.

Four powerful blasts hit Assam, the ULFA (I) accepted responsibility | चार शक्तिशाली स्फोटांनी आसाम हादरले, उल्फाने (आय) स्वीकारली जबाबदारी

चार शक्तिशाली स्फोटांनी आसाम हादरले, उल्फाने (आय) स्वीकारली जबाबदारी

Next

गुवाहाटी : आसामच्या दिब्रुगड आणि चराईदेव जिल्ह्यात रविवारी सकाळी चार शक्तिशाली स्फोट झाले. प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना रविवारी सकाळी ८.२५ वाजता १० मिनिटाच्या अंतराने हे स्फोट झाले. दरम्यान बंदी असलेल्या उल्फाने (आय) या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन स्फोट दिब्रुगडमध्ये आणि एक स्फोट चराईदेव जिल्ह्यात झाला. स्फोटात कोणतीही प्राणहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्यामुळे बहुतांश लोक आपल्या घरातच होते. पहिला स्फोट चराईदेव जिल्ह्याच्या सोनाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिओकघाट परिसरात एका दुकानाच्या बाहेर झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) पद्मनाथ बरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिब्रुगड जिल्ह्यात तीन स्फोट झाले. दोन स्फोट ग्राहम बाजार आणि एक एटी रोडवर एका गुरुद्वाराच्या मागे पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर दुलियाजन तिनिआली शहरात झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटरसायकलवर आलेले दोन युवक ग्रेनेड फेकून पळून गेल्याचे दिसत आहे. पद्मनाभ बरुआ यांनी सांगितले की, ग्राहम बाजार आणि एटी रोडवर वेळ नियंत्रित केलेल्या आयईडीच्या साहाय्याने स्फोट करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे. ईशान्येकडील इतर अनेक प्रतिबंधित संघटनांसोबत उल्फाने (आय) प्रजासत्ताक दिनाच्या समारोहावर बहिष्काराचे आवाहन केले होते. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी टिष्ट्वटरवर स्फोटांची निंदा करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘एका पवित्र दिवशी दहशत पसरविण्यासाठी केलेला हा भ्याड हल्ला आहे. पूर्णपणे नाकारल्यानंतर यातून दहशतवादी समूहाची निराशा दिसते. आमचे सरकार दोषींना पकडून कडक कारवाई करणार आहे, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. सोनोवाल यांनी आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांच्याशी चर्चा केली. परिस्थिती पूर्वपदावर आणून स्फोटात सहभागी दोषींना लवकर पकडण्यासाठी शक्यतो उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी महंत यांना दिले.

उल्फाने जारी केले निवेदन...
उल्फाने गणराज्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याचे पाहता सुरक्षा यंत्रणांनी उल्फाकडे (आय) अंगुलीनिर्देश केला असताना या दहशतवादी संघटनेने एक निवेदन जारी करीत स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Web Title: Four powerful blasts hit Assam, the ULFA (I) accepted responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.