चार राज्ये दुष्काळाच्या छायेत
By admin | Published: July 7, 2014 04:15 AM2014-07-07T04:15:22+5:302014-07-07T04:15:22+5:30
मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़
नवी दिल्ली : मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़ हीच स्थिती कायम राहिल्यास कृषी उत्पन्न घटण्यासोबतच पाणी आणि विजेच्या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते़
एका वृत्तसंस्थेने देशभरातील स्थितीचा अंदाज घेऊन एक अहवाल जारी केला आहे़ त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक यासारख्या राज्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे़ पावसाने हुलकावणी दिल्याने अद्यापही अनेक भागांतील पेरण्या रखडल्या आहेत़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात सरासरीच्या ४३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ मान्सून अनुकूल नसल्याच्या वृत्ताने आधीच खाद्यान्न, भाजीपाला व फळांच्या किमती वधारल्या आहेत़ येत्या दिवसांत या किमती आणखी भडकण्याची चिन्हे आहेत़
राज्य सरकारांनी दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना सवलतीने डिझेल आणि बियाणे देण्यावर केंद्र सरकारला अगत्याने विचार करावा लागेल. याशिवाय महागाई नियंत्रणासाठीही कसरत करावी लागेल. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जलशयांमध्ये फार कमी जलसाठा उरला आहे़ स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने स्थिती आणखी गंभीर राहण्याचे सूतोवाच केले आहे़ उत्तर पश्चिम भारतात दुष्काळाची ८० टक्क्यांपेक्षा अधिक शक्यता असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)