चार राज्यांनी केली इंधन अधिभारात कपात; वाढत्या दरांमुळे नागरिक चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:58 PM2021-02-22T23:58:24+5:302021-02-22T23:58:32+5:30
निवडणुकीची तयारी : वाढत्या दरांमुळे नागरिक चिंतित
नवी दिल्ली : देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली वाढ ही केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीमुळे नसून त्यावर असलेला अधिभारही कारणीभूत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करण्यास नकार दिला असला तरी चार राज्यांनी अधिभार कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय दरामधील वाढीमुळे ही वाढ होत असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र इंधनावर लावण्यात आलेल्या विविध कर आणि अधिभारांमुळे या दरांमध्ये मोठी वाढ होत आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, या उद्देशाने सर्वप्रथम राजस्थान सरकारने इंधनावरील व्हॅट कमी केला. त्यापाठोपाठ आसाम आणि मेघालयानेही कर कमी केले.
आता या यादीमध्ये पश्चिम बंगालचाही समावेश झाला आहे. या राज्यातही आसामप्रमाणेच लवकरच निवडणुका होत असल्याने तेथील नागरिकांना राज्य सरकारने कर कमी करून दिलासा दिला आहे. अन्य राज्य सरकारांकडूनही अशाच प्रकारचा लाभ मिळण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत.
केंद्राचा स्पष्ट नकार
इंधनावरील कर कमी करण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आहे. मागील वर्षाच्या मार्च आणि मे महिन्यामध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे १३ आणि १६ रुपयांचा अबकारी कर लावला आहे. त्यामुळे तो कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी होत असली तरी तसे करण्यास केंद्र सरकार तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.