चार अतिरेक्यांना काश्मिरात कंठस्नान
By admin | Published: February 13, 2017 04:17 AM2017-02-13T04:17:04+5:302017-02-13T04:17:04+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटे झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात दोन जवान शहीद व एक नागरिक ठार
कुलगाम : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटे झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात दोन जवान शहीद व एक नागरिक ठार झाला. चकमकीचे राज्यात हिंसक पडसाद उमटल्यानंतर आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात १ ठार, तर १५ जखमी झाले.
कुलगाम जिल्ह्यातील नगबल गावात लष्कर-ए-तोएबा व हिज्बुल मुजाहिदीनचे अतिरेकी लपले असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर लष्कराने कारवाई केली. सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. ज्या घराच्या परिसरात चकमक सुरू होती; त्या घरमालकाचा मुलगा यात सापडला व दुर्दैवाने ठार झाला, असे पोलीस महासंचालक एस.पी. वैैद यांनी सांगितले.
चकमकीत जखमी झालेल्या भारतीय लष्कराच्या ३ जवानांना विमानाने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले. (वृत्तसंस्था)
बनावट छताआड लपले होते अतिरेकी
स्पेशल आॅपरेशन्स ग्रुपने अतिरेकी लपलेल्या गावाला रविवारी पहाटे ३.३० वाजता घेरले. राष्ट्रीय रायफल्सचे विशेष पथकही दाखल झाले. सुरुवातीला हाती काही लागले नव्हते. पुन्हा घरमालकाच्या मुलाच्या मदतीने शोधसत्र हाती घेण्यात आले. त्या वेळी घराचे छत बनावट असल्याचा संशय आल्यावरून ते काढण्यास सांगितले असता तेथे लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यात लान्सनायक रघुबीरसिंग व लान्सनायक भंदोरिया गोपालसिंग शहीद झाले व घरमालकाचा मुलगा ठार झाला. तीन तास चाललेल्या या चकमकीत लष्कर-ए-तोएबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. हिंसक निदर्शनांमध्ये जमावाची
दगडफेक व सुरक्षा दलांचा गोळीबार चकमकीचे वृत्त कळताच कुलगाम भागात हिंसक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी लष्कर व सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक केली. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात १५ जण जखमी झाले. त्यापैैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.