मोदींच्या कपड्यात एकाच दिवसात चारवेळा बदल, सोशल मीडियावरुन PM ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:22 PM2019-02-06T13:22:47+5:302019-02-06T13:23:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू काश्मीरमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चार सभांमध्ये सहभागी झाले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी चार वेगवेळ्या कपड्यात दिसून आले. त्यानंतर सोशल मीडियावर मोदींच्या या ड्रेसबदलाची चांगलीच चर्चा रंगली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला होता. या दौऱ्यात मोदींनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्याचवेळी, मोदींच्या बदलत्या पोशाखाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू काश्मीरमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चार सभांमध्ये सहभागी झाले होते. या चारही सभेच्या ठिकाणी मोदींनी वेववेगळे कपडे परिधान केल्याचं दिसून आलं. हे चारही पोशाख काश्मिरी संस्कृतीशी मिळते-जुळते होते. विशेष म्हणजे यापूर्वींच्या मोदींच्या सभेतही मोदींचा पोशाख हा तेथील संस्कृती आणि परंपरांशी मिळता जुळता दिसून आला आहे. मात्र, यावेळी एकाच दिवसात चारवेळा पोशाख बदलल्यामुळे मोदींच्या कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली. तर, अनेक नेटीझन्सकडून मोदींच्या या पोशाखाची खिल्लीही उडविण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एकाने मोदींच्या 18 तासांच्या कामाची तुलना करताना काश्मीरमधील पोशाखाचा फोटो अपलोड केला आहे. तर, एका दिवसात चारवेळा कपडे बदलणे, हेही जोखमीचे काम असल्याचा टोला लगावला आहे. तर, एका दिवसात पाचवेळा मोदी कपडे बदलतात अन् लोकं विचारतात की, मोदींनी पाच वर्षात काय केलं.... असे विनोदी ट्विट अनेक ट्विटर्संने केले आहेत. तसेच, एकाने मजेशीर ट्विट लिहिताना, हे फक्त एखादा फकीरच करू शकतो, असे म्हटले आहे.