नसबंदी जिवावर बेतली; चार महिलांचा मृत्यू, सात महिला गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 08:41 AM2022-08-31T08:41:58+5:302022-08-31T08:42:36+5:30
DPL हा महिला नसबंदी कार्यक्रम आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील सरकारी रुग्णालयात 25 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तेलंगानामध्ये खळबळ उडाली आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच दिवसांत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ९ महिलांची प्रकृती गंभीर बनली आहे, त्यांच्यावर हॉस्पटलमध्ये उपचार सुरु आहेत. या सर्व महिलांची पाच दिवसांपूर्वी डबर पंक्टर लेप्रोस्कोपी शिबिरात नसबंदी करण्यात आली होती.
हे ऑपरेशन खुपच कमी वेळेचे आणि साधे असते. ऑपरेशन झाल्यावर काही तासांतच महिलेला घरी जाऊ दिले जाते. तसेच त्या नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे करू शकतात. अशा ऑपरेशनमुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच नसबंदीनंतर मृत्यू झाल्याने यापुढे कोणी त्यासाठी धजावेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
DPL हा महिला नसबंदी कार्यक्रम आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील सरकारी रुग्णालयात 25 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 34 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या महिलांनी गॅस्ट्रोएन्टेरिटिससह अनेक लक्षणे सांगितली होती, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी सांगितले.
मृत पावलेल्या महिलांना उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि शस्त्रक्रियेनंतर अतिसार सारखा त्रास होऊ लागला होता. अवयव निकामी झाल्याने महिलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व महिलांचे वय 22 ते 36 वर्षे होते.
शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. चार महिलांच्या मृत्यूनंतर इतर 30 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 7 महिलांना खबरदारी म्हणून शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांवर येथील शासकीय निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरू आहेत, असे राव म्हणाले.