टोमॅटो रिंग समजून खेळणं गिळल्याने चारवर्षाच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 02:12 PM2017-11-02T14:12:21+5:302017-11-02T14:18:26+5:30
खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये काहीवेळा खाद्यपदार्थांच्या पाकिटाला एखादे खेळणे चिकटवलेले असते. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किंवा दुकानदाराकडून अशी शक्कल लढवली जाते.
हैदराबाद - खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये काहीवेळा खाद्यपदार्थांच्या पाकिटाला एखादे खेळणे चिकटवलेले असते. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किंवा दुकानदाराकडून अशी शक्कल लढवली जाते. खाद्यपदार्थाच्या पाकिटातील असेच एक प्लास्टिकचे खेळणे एका चारवर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले. आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील इलुरु शहरात ही धक्कादायक घटना घडली.
मीसाला निरीक्षण हा चारवर्षांचा मुलगा दुकानातून आणलेल्या टोमॅटो रिंगच्या पॅकेटमधील टोमॅटो रिंग खात होता. त्याचवेळी चुकून त्याने टोमॅटो रिंग समजून प्लास्टिकचे खेळणे गिळले. यानंतर मीसालाला उलटया सुरु झाल्या. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे आईच्या लक्षात आले. हे प्लास्टिकचे खेळणे त्याच्या गळयात अडकले होते.
या मुलाची तब्येत बिघडल्यानंतर त्याचे आई-वडिल त्याला लगेच सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या आई-वडिलांनी खाद्यपदार्थ बनवणा-याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.