आंध्र प्रदेशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:13 AM2017-09-22T10:13:13+5:302017-09-22T11:42:21+5:30
एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गुंटूर, दि. 22- भटक्या कुत्र्यांकडून लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेलं पाहायला मिळतं आहे. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. तेथे एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी गुंटूर जिल्ह्यातील अदविताक्केलापडूमधील राजीव गृहा कल्प अपार्टमेंटच्या बाजूला ही संपूर्ण घटना घडली आहे. दुकानात जाणाऱ्या चार वर्षीय दुपती प्रेम कुमार या चिमुरड्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता. वेफर्स घेण्यासाठी दुकानात जात असताना ही घटना घडली.
चार वर्षीय दुपती प्रेम कुमार दुकानात जात असताना त्याच्या ओरडण्याचा आवाज एका महिलेने ऐकला. काही कुत्रे कुमारवर हल्ला करत असल्याचं त्या महिलेने पाहिलं. त्यावेळी तिने कुत्र्यांवर दगडं मारून त्यांना हकलविण्याचा व त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाहून तेथे असणारी काही लोकही मदतीसाठी धावून आली. तो पण तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात कुमार जबर जखमी झाला होता. त्या कुत्र्यांनी मुलाच्या गळ्यावर व हातावार चावा घेतला होता. त्यामुळे त्याला तेथे जबर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर कुमारलाल लगेचच गुंटूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये कुमारचा मृत्यू झाला. कुमारचे आई-वडील, मल्लीस्वारी आणि येसुबाबू रोजंदारी करतात. त्यामुळे ही घटना जेव्हा घडली तेव्हा ते दोघेही घरी नव्हते.
शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्याबाबतच्या आवश्यक उपाययोजनांसाठी काम सुरू आहे, असं गुंटूर महापालिकेच्या आयुक्त सी. अनुराधा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सगळीकडेच घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या घटना याआधी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भिंवडीमध्ये एका मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी धीरज यादव या ८ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे लचके तोडले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. धीरज सकाळी साडेनऊच्या सुमारास सलमान शेख या मित्रासोबत कचऱ्याच्या ठिकाणी काचेच्या गोट्या शोधण्यासाठी पाइपलाइनवरून जात होता. धीरजने १५ फूट दलदलीत उडी मारली, तेव्हा तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हे दृश्य पाहून घाबरलेला सलमान घरी जाऊन बसला. दुपारी साडेअकरा वाजता फेणेभागात राहणारा यंत्रमाग कामगार सबाजित बिंद त्याच पाइपलाइनवरून जेवणासाठी घरी जात असताना लहान मुलावर कुत्रे हल्ला करत असल्याचे दिसले. त्याने खोलीमालक काथोड धुमाळ यांना ही घटना सांगितली. दोघांनी मिळून त्या भटक्या कुत्र्यांना तेथून पळवून लावत धीरजची सुटका केली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला होता. त्याला इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला.