शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अनेकांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:33 AM2020-03-16T08:33:10+5:302020-03-16T08:43:01+5:30
रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला.
जगदलपूरः शाळेत शिकवत असल्यानं लहानग्यांना 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' अशी गाणी म्हणण्यास फार आवडतात. कधी ना कधी ही गाणी आपल्याला लहानपणीच्या आठवणीतही घेऊन जातात. रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. छत्तीसगडच्या सशस्त्र बला(CAF) चे जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करत असताना वडिलांना पाहून तो चार वर्षांचा चिमुकला 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' असं गाणं गाऊ लागल्यानंतर शेकडो लोकांना अश्रू अनावर झाले.
बस्तरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात छत्तीसगड सशस्त्र बलाचे दोन जवान शहीद झाले. यातील उपेंद्र साहू यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिदाचं पार्थिव घराजवळच असलेल्या नदीच्या किनारी ठेवण्यात आलं होतं. शहीद झालेल्या जवानाला चार वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.
शहीद जवानाच्या पार्थिव शरीराला खांदा देऊन इंद्रावती नदीच्या पुलाच्या किनारी आणण्यात आलं. त्यानंतर शहिदाच्या पार्थिवाभोवती पुष्पचक्र परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे शहिदाला पुन्हा एकदा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं आहे. शहिदाचा मुलगा लकीला वाटलं कोणता तरी खेळ सुरू आहे. नातेवाईकांच्या खुशीत तो 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' हे गाणं गाऊ लागला. त्या चिमुकल्याला हे गाणं गाताना पाहून शहिदाला निरोप देण्यासाठी आलेल्या शेकडो उपस्थितांना अश्रू अनावर झाले.