'माझ्यासमोरही केलं होतं हस्तमैथुन', बीएचयूच्या माजी विद्यार्थिनीचा अंगावर काटा आणणारा अनुभव
By sagar sirsat | Published: September 25, 2017 07:08 PM2017-09-25T19:08:50+5:302017-09-25T20:33:29+5:30
'त्या गुंडांनी थेट तरूणीच्या कपड्यांमध्ये हात टाकला आणि राक्षसासारखे ते हसत होते, हेच त्यांचं पुरुषत्व होतं'.
वाराणसी - दिवसेंदिवस तरुणींसोबत अश्लील चाळे, अश्लील भाषेचा वापर आणि छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनी स्वतःच्या सुरक्षेची मागणी करत युनिव्हर्सिटीमध्ये निदर्शनं करत आहेत. निदर्शन करणा-या या विद्यार्थिनींवर शनिवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कुलगुरूंना भेटण्याची मागणी या विद्यार्थिनी करत होत्या. मात्र, कुलगुरूंनी त्यांची भेट घेतली नाही.
दरम्यान, बीएचयूची माजी विद्यार्थिनी असलेल्या जयंतिका सोनी हिने तिच्यासोबत झालेल्या अशाच काही अंगावर काटा आणणा-या घटनांचा अनुभव सांगितला आहे. medium.com नावाच्या वेबसाइटवर तिने एक लेख लिहिला आहे. चार वर्ष आम्ही पण हे सर्व प्रकार पाहिलेत. आजची परिस्थिती पाहून मला राग अनावर होत आहे कारण तेथे दहा वर्षात काहीच बदल झालेला नाही, असा संताप तिने आपल्या लेखातून व्यक्त केलाय.
पहिल्या वर्षीचा अनुभव सांगताना सोनी लिहिते, बीएचयूमध्ये फर्स्ट इयरला असताना मला 7 वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले होते. या नियमाचं पालन स्वतःच्या सुरक्षेसाठी करावं, असं सांगण्यात आलं होतं. उन्हाळ्याच्या दिवासांमध्ये एकदा दुपारी तीन वाजता मी आणि माझी एक मैत्रिण सेमी सर्कुलर रोड नंबर 5 च्या रस्त्याने हॉस्टेलमध्ये परतत होतो. तेवढ्यात सफेद रंगाच्या स्कूटरवर एक तरूण आला आणि थेट तो आमच्यासमोर येवून थांबला. कसलाही विचार न करता त्याने आमच्या समोरच चक्क हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. मी आणि माझी मैत्रिण खूप घाबरलो, आम्ही तेथून कसेतरी पळालो. वयाच्या 17 व्या वर्षी युनिव्हर्सिटीच्या आतमध्येच मला हे सर्व पाहावं लागलं.
त्याचवर्षी माझ्या एका मैत्रिणीसोबत विश्वकर्मा हॉस्टेलजवळ संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास दोन मुलांनी छेडछाड केली. त्यांनी थेट तरूणीच्या कपड्यांमध्ये हात टाकला आणि राक्षसासारखे ते हसत होते. हेच त्यांचं पुरुषत्व होतं. त्यामुळे पहिल्याच वर्षी आम्हाला हे समजलं की काही झालं तरी सेमी सर्कुलर रोड नंबर 5 चा वापर आपल्याला करायचा नाहीये.
तिस-या वर्षाचा अनुभव लिहिताना जयंतिका सोनी हिने लिहिलं, मी एक दिवस सकाळी 6-7 वाजता चालण्यासाठी आयटीबीएचयू रोडडवर निघाले होते. तेव्हा एका हॉस्टेलपासून एक तरुण गाडीवर माझा पाठलाग करत होता. तो निघून जावा यासाठी मी एका ज्यूसच्या दुकानावर थांबले, पण काही उपयोग झाला नाही. त्याने माझा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. मी त्याच्या गाडीचा नंबर लिहून ठेवला होता. जेव्हा मी वॉर्डन आणि गार्डकडे याबाबत तक्रार केली असता तो तरुण युनिव्हर्सिटीतील स्टाफचा नातेवाईक असल्याचं समजलं. त्यानंतर मी माझ्या एका मित्राला सोबत घेऊन मॉर्निंग वॉकला जायला लागली पण त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
चौथ्या वर्षाचा अनुभव सांगताना जयंतिका सोनी म्हणते, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा महिना होता. सायकल रिक्षातून माझ्या एका मैत्रिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. हॉस्टेलचे प्रॉक्टर तेथून केवळ 200 मीटर दूर होते तरीही त्या गुंडांनी अपहरणाची हिंमत केली. पण त्या तरूणीसोबत बसलेल्या दुस-या तरुणीने तिला घट्ट पकडून ठेवलं, त्यामुळे गुंडांना अपहरण करण्याता अपयश आलं आणि ते तेथून निघून गेले. त्यानंतर आम्हीही सुरक्षेसाठी आंदोलन केलं. आठवडाभर प्रदर्शन केल्यानंतर रस्त्यावर लाइट लावण्यात आली आणि पेट्रोलिंग सुरू करण्यात आली. पण केवळ 2 आठवड्यातच पेट्रोलिंग बंद झाली आणि परिस्थिती जशी होती तशीच झाली.
10 वर्षांनंतरही युनिव्हर्सिटीत काहीही बदल झालेला नाही, आज देखील तिथे तरुणी असुरक्षितच आहेत, परिस्थिती जैसे थे आहे, असं लेखाच्या अखेरीस सोनीने लिहिलंय.