संसदेची सुरक्षा भेदली आणि संपूर्ण देश हादरला; २२ वर्षांनी त्याच दिवशी पुन्हा संसदेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:09 AM2023-12-14T05:09:57+5:302023-12-14T05:10:10+5:30

यातील चार हल्लेखोर तरुण पकडले गेले असून या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे.

Four youths have reportedly attacked Parliament on Wednesday | संसदेची सुरक्षा भेदली आणि संपूर्ण देश हादरला; २२ वर्षांनी त्याच दिवशी पुन्हा संसदेवर हल्ला

संसदेची सुरक्षा भेदली आणि संपूर्ण देश हादरला; २२ वर्षांनी त्याच दिवशी पुन्हा संसदेवर हल्ला

संजय शर्मा

नवी दिल्ली : १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला बुधवारी २२ वर्षे झाली... शहीदांना आदरांजली वाहून संसदेचे कामकाज सुरू झाले आणि काही वेळातच संसदेत हल्ला झाला... लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या, घोषणाबाजी केली. स्मोक क्रॅकर फोडून धूर केला... देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. यातील चार हल्लेखोर तरुण पकडले गेले असून या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे.

 या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली. दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी ओम बिर्ला यांच्याशी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलिस, आयबी, फॉरेन्सिक, एनआयसह सरकारच्या सर्व सुरक्षा एजन्सीजनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. 

सोशल मीडियावर ओळख, मग हल्ल्याचा कट

चार आरोपी एकमेकांना ओळखतात. हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी संसदेवर हल्ल्याची योजना आखली. या आरोपींना आश्रय देणाऱ्या विकी शर्मा व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली.  ललित झा घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खासदारांच्या पीएचे पास रद्द

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक बैठका घेतल्या व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी प्रेक्षक गॅलरीचे सर्व पास रद्द केले. सर्व विद्यमान व माजी खासदारांच्या पीएचे पासही रद्द केले.

विधिमंडळाचा पास देण्यावर निर्बंध

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रिकेवर निर्बंध आणण्यात आले आहेत. यापुढे आमदारांना केवळ दोनच पास दिले जातील, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

तरुणांकडे कोणाचा पास? 

सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम या चौघांचे पास म्हैसूरचे भाजप खा. प्रताप सिम्हा यांच्या नावावरून काढण्यात आले होते. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून स्पष्टीकरण देत ते म्हणाले, मतदारसंघातील लोकांच्या सांगण्यावरून पास तयार केले होते. त्यांना मी ओळखत नाही. 

हल्लेखोरांचे म्हणणे काय?

चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनासारख्या मुद्द्यांवर आपण नाराज आहोत. मणिपूरचे संकट, बेरोजगारी हे मुद्देही आहेत. म्हणूनच आपण हे पाऊल उचचले.

आयबीने दिला होता अलर्ट

इंटेलिजन्स ब्युरोने केंद्रीय तपास यंत्रणा व सरकारला अलर्ट दिला होता.  कॅनडातील अतिरेकी पन्नू हा भारतातील संसदेवर हल्ला करू शकतो, असे म्हटले होते. 

Web Title: Four youths have reportedly attacked Parliament on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद