मुथरेत दरोडेखोरांच्या चकमकीत निष्पाप मुलाचा मृत्यू, चार पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:08 PM2018-01-18T20:08:22+5:302018-01-18T20:08:34+5:30
मथुरेत दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका निष्पाप मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेश- मथुरेत दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका निष्पाप मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. लहानग्याचा मृत्यूनंतर चहूबाजूंनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका होऊ लागल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन पोलीस अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबलना निलंबित केलं आहे.
तसेच पीडित मुलाच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारनं 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्याच्या आयजींकडे चौकशी सोपवली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आलं आहे. कॉन्स्टेबल सौरभ शर्मा आणि उधम सिंह यांनी मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल न केल्याच्या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं
शाळा लवकर सुटावी म्हणून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे हा गंभीर प्रकार घडला आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मंगळवारी ब्राईटलँड इंटर स्कूल या शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक शर्मा हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. तुझं नाव काय, तुला शिक्षकांनी बोलावले आहे, असे सांगत त्या मुलीने ह्रतिकला काही कळायच्या आत त्याच्या तोंडावर हात ठेवून खेचत त्याला शाळेतील स्वच्छता गृहात नेले. मुलगा ओरडायला लागल्यावर तिने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. ओढणीच्या सहाय्याने त्याचे हातपाय बांधले. दरवाजा बंद करुन तिने तीक्ष्ण हत्याराने ह्रतिकच्या पोटावर आणि छातीवर वार करायला सुरूवात केली. रक्तबंबाळ झालेल्या ह्रतिकला बाथरुममध्येच कोंडून ती पळून गेली. ह्रतिकचा आवाज ऐकून शाळेतील काही कर्मचा-यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा उघडला. रक्तबंबाळ अवस्थेत ह्रतिक पडला होता. त्याचे हातपाय बांधले होते, तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे.