इसिसशी संबंधांमुळे चौघांना अटक
By admin | Published: October 9, 2016 12:24 AM2016-10-09T00:24:31+5:302016-10-09T00:24:31+5:30
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोइम्बतूर येथे चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची
कोइम्बतूर : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोइम्बतूर येथे चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
या चौघांचे कन्नूर (केरळ) येथे पकडलेल्या इतर संशयितांसोबत संबंध असल्याचा संशय असून, त्याअनुषंगाने त्यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौघांची नावे कन्नूर येथे अलीकडेच पकडलेल्या अबू बशीर याच्या कॉन्टक्ट लिस्टमध्ये (संपर्क यादी) आढळून आल्यानंतर एनआयएने शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. इसिसपासून प्रेरणा घेऊन हल्ल्याचा कट रचल्याच्या संशयावरून ६ जणांना कन्नूरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यात बशीरचा समावेश होता. बशीर हा मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे.
बशीरचे फेसबुक फ्रेंड आणि त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या शहरातील ११ जणांची एनआयएने आतापर्यंत चौकशी केली असून, त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन्स व इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् जप्त केली आहेत. या सर्वांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली.
हे चौघे जी.एम.नगरचे रहिवासी आहेत. बशीर या भागात काही काळ वास्तव्याला होता आणि त्याने अनेक तरुणांना परदेशात चांगल्या नोकऱ्या देऊ केल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)