हरयाणात जेजेपीची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत ७२ उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:06 AM2019-10-04T05:06:44+5:302019-10-04T05:07:14+5:30
चंदीगड : जननायक जनता पार्टीने (जेजेपी) हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी आपली ३० उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षाचे नेते ...
चंदीगड : जननायक जनता पार्टीने (जेजेपी) हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी आपली ३० उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उचाना कलान येथून निवडणूक लढणार आहेत आणि पुन्हा एकदा भाजपच्या विद्यमान आमदार प्रेम लता यांच्याशी लढत देणार आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत प्रेम लता यांनी दुष्यंत यांचा ७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. हरियाणात २१ आॅक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. जींद जिल्ह्यातील उचाना कलान हा माजी कें द्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांचा गड राहिलेला आहे. यापूर्वी पाच वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दुष्यंत यांचा यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे बृजेंद्र सिंह यांच्याकडून पराभव झाला होता. बृजेंद्र हे प्रेम लता आणि बीरेंद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत.
बीरेंद्र सिंह आणि चौटाला यांचे कुटुंबियात अशा प्रकारे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. ओ. पी. चौटाला यांनी २००९ मध्ये उचाना कालान या मतदारसंघातून बीरेंद्र सिंह यांना ६२१ मतांनी पराभूत केले होते. दुष्यंत आणि बीरेंद्र सिंह दोघेही राज्यातील प्रमुख जाट समुदायाचे आहेत. जींद जिल्हा हा हरियाणाचे राजकीय केंद्र समजला जातो. जेजेपीने जाहीर केलेल्या यादीत माजी आमदार अर्जुन सिंह यांचेही नाव आहे. त्यांना जगाधरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने मंगळवारी २० उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत पक्षाने ७२ उमेदवारांची यादी जाहीर केली
आहे. (वृत्तसंस्था)
जेजेपीने जाहीर केलेल्या ३० जणांच्या यादीत बीएसएफचे माजी जवान तेज बहादूर यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे. करनालमधून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असून, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध ते मैदानात असतील. यादव यांना २०१७ मध्ये बीएसएफमधून बरखास्त करण्यात आले होते. कारण, सैनिकांना देण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत एक व्हिडिओ पोस्ट केला होता.