चौथी लस लवकरच बाजारात; झायकोव्ह-डी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:20 AM2021-06-26T09:20:29+5:302021-06-26T09:20:51+5:30
झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता बळावली आहे.
देशात सद्य:स्थितीत कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या तीन कोरोनाप्रतिबंधक लसी देण्यात येत आहेत. त्यातही स्पुतनिक व्ही लसीचे काही हजार डोसच उपलब्ध आहेत. त्यामुळे अधिकाधिक लसी भारतात येणे गरजेचे आहे. झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता बळावली आहे.
तीन डोसवाली लस
देशात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या तीनही लसी दोन डोसवाल्या आहेत. मात्र, ‘झायकोव्ह डी’ ही लस तीन डोसवाली असेल. या लसीच्या पहिल्या डोसनंतर उर्वरित दोन डोस २८व्या आणि ५६व्या दिवशी दिले जातील. लस दोन डोसमध्ये देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
डीएनए आधारित पहिली लस
झायडस कॅडिला ही औषध कंपनी ‘झायकोव्ह डी’ या लसीची निर्मिती करत आहे. या लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. औषध महानियंत्रकांकडे कंपनीने त्यासाठी अर्ज करणे बाकी आहे. ‘झायकोव्ह डी’ ला मंजुरी मिळाली तर ती डीएनए आधारित पहिली लस ठरणार आहे.
डीएनए आधारित लस शरीराची रोग प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी जनुकीय साहित्याचा वापर करते. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ही लस ठेवता येऊ शकते. तसेच खोलीचे तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तरी लस खराब होण्याची शक्यता कमीच असेल.
लस कशी दिली जाईल-
- ‘झायकोव्ह डी’ ही नीडल फ्री लस आहे.
- ही लस देताना जेट इंजेक्टरचा वापर केला जाणार आहे.
- जेट इंजेक्टर ही पद्धत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
- या पद्धतीत उच्च दाबाने लस त्वचेवर इंजेक्ट केली जाते.
- जेट इंजेक्टरमध्ये दाबासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंग यांचा वापर केला जातो.
- अमेरिकेसह युरोप, आफ्रिका आणि आशियातील काही देशांमध्ये जेट इंजेक्टरचा वापर होतो.
- जेट इंजेक्टरमुळे रुग्णास जास्त त्रास होत नाही तसेच संसर्गाचा धोका कमी होतो.