सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनची माघार; वेदांता म्हणते, दुसरे भागीदार तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:41 AM2023-07-11T05:41:12+5:302023-07-11T05:41:45+5:30
या प्रकल्पात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी करार केला होता.
नवी दिल्ली : वेदांता समूहासोबतच्या भागीदारीतील गुजरातमधील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली. सोमवारी निवेदनाद्वारे फॉक्सकॉनने हे जाहीर केले. या प्रकल्पासाठी आणखी एक तंत्रज्ञान भागीदार आवश्यक होता. तो मिळविण्यास संघर्ष करावा लागत असल्याने फॉक्सकॉन यातून बाहेर पडली आहे.
या प्रकल्पात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी करार केला होता. यात वेदांताचा ६० टक्के, तर फॅक्सकॉनचा ४० टक्के वाटा होता. फॉक्सकॉनने म्हटले की, आम्ही भारताच्या 'मेक इन इंडिया' पुढाकाराला समर्थन देतच राहू
प्रकल्प होणारच; वेदांताचा दृढनिश्चिय
दरम्यान, सेमीकंडक्टर प्रकल्प होणारच, असा दृढनिश्चय व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भागीदारीसाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत, असे 'वेदांताने म्हटले आहे.
भारताच्या ध्येयावर परिणाम नाही : आयटी राज्यमंत्री
फॉक्सकॉनच्या माघारीमुळे सेमीकंडक्टरच्या उत्पादनाबाबत भारताने निश्चित केलेल्या ध्येयावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास देशाचे इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे.