‘स्कॉर्पिन’प्रकरणी फ्रान्सने तत्काळ चौकशी करावी!
By admin | Published: August 26, 2016 03:55 AM2016-08-26T03:55:26+5:302016-08-26T06:54:38+5:30
‘स्कॉर्पिन’ पाणबुड्यांची गोपनीय माहिती फुटल्याचा मुद्दा भारतीय नौदलाने फ्रान्सच्या शस्त्रास्त्र महासंचालकांसमोर उपस्थित केला
नवी दिल्ली : ‘स्कॉर्पिन’ पाणबुड्यांची गोपनीय माहिती फुटल्याचा मुद्दा भारतीय नौदलाने फ्रान्सच्या शस्त्रास्त्र महासंचालकांसमोर उपस्थित केला आहे. या प्रकरणाची तत्परतेने चौकशी करून त्याची माहिती भारताला द्यावी, अशी मागणीही केल्याची माहिती गुरुवारी नौदलाने दिली.
सुरक्षेच्या बाबतीत काही तडजोड तर झाली नाही ना? याची खातरजमा करण्यासाठी अंतर्गत आॅडिट सुरू करण्यात आल्याचेही नौदलाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, नौदलाने बुधवारीच स्पष्ट केले होते की, ही माहिती देशातून नव्हे, तर विदेशातून फुटली असावी.
नौदलाने सांगितले की, ‘दी आॅस्ट्रेलियन’च्या वेबसाईटने त्यांच्याकडे असलेल्या २२,४०० पानांपैकी काही पानेच सार्वजनिक केली आहेत. भारतात तयार होत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडीच्या वैशिष्ट्यांपेक्षा ही माहिती खूप वेगळी आहे, असा दावाही भारतीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे. संरक्षणतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, भलेही फुटलेल्या माहितीतून भारताला धोका असो वा नसो; पण ही घटना चिंताजनक आहे.
संरक्षण विश्लेषक उदय भास्कर यांनी म्हटले आहे की, जर दस्तऐवज खरे असतील, तर निश्चितच भारताच्या सुरक्षेशी तडजोड झाली आहे. पाणबुडीच्या तंत्रज्ञानाची माहिती फुटली, तर त्यांच्या क्षमतेबाबत माहिती उघड होईल. सेवानिवृत्त रिअर अॅडमिरल राजा मेनन यांच्या मतेही हा गंभीर मुद्दा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात पर्रीकर यांना एक अहवाल सादर केला जाईल. विशेष म्हणजे आॅस्ट्रेलियन वृत्तपत्राने जे दस्तऐवज प्रसिद्ध केले आहेत त्यात भारतीय नौदलाचे चिन्हही आहे.
फुटलेल्या दस्तऐवजात भारतीय सहा नव्या पाणबुड्यांची रडारपासून बचावाची गोपनीय क्षमतेची माहिती आहे. या पाणबुड्यांची मजबुतीची माहितीही यात आहे. या पाणबुड्या वेगात असताना किती आवाज करतात आदी बारीकसारीक माहिती यात आहे. वृत्तपत्राने मिळविलेल्या माहितीत पाणबुडीच्या पाण्यातील माहितीबाबतची ४,४५७ पाने, पाण्याच्या वरच्या भागातील माहितीची ४,२०९ पाने, युद्धप्रणालीबाबतची ४,३०१ पाने, तर हल्ला करण्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित ४९३ पाने आहेत. याशिवाय पाणबुडीच्या संचाराबाबत ६,८४१ पाने आणि दिशासूचक तंत्राबाबत २,१३८ पाने आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>माहिती आमच्याकडून फुटली नाही
‘स्कॉर्पिन’ वर्गातील पाणबुड्यांची गोपनीय माहिती आमच्याकडून फुटली नाही, असा दावा माझगाव डॉक लिमिटेडने (एमडीएल) केला आहे. या प्रकरणी तपासासाठी नौदलाला सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘स्कॉर्पिन’ पाणबुड्यांची निर्मिती माझगाव डॉक येथेच होत आहे. एमडीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडून कोणतीही माहिती फुटली नाही. तथापि, फुटलेले दस्तऐवज हे खरे आहेत का? याबाबत खात्री करण्याची गरज आहे.
>पथक विदेशात जाणार?
ही गोपनीय माहिती फुटल्याच्या वृत्तानंतर संरक्षण मंत्रालयात याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. नौदलाचे प्रमुख सुनील लान्बा यांच्यासह प्रमुख अधिकारी सातत्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना याबाबत माहिती देत आहेत. गरज भासल्यास याबाबतची माहिती मिळविण्यासाठी एक पथक विदेशात पाठविण्यात येईल, असेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.