फ्रान्स भारताला देणार ३६ लढाऊ विमाने, संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले गुरुवारपासून येणार भारताच्या दौ-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:48 AM2017-10-23T04:48:59+5:302017-10-23T04:49:17+5:30
फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले येत्या गुरुवारपासून भारताच्या दौ-यावर येत असून, भारताला अधिक राफेल लढाऊ विमाने विकण्याचा मार्ग या वेळी मोकळा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नवी दिल्ली : फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले येत्या गुरुवारपासून भारताच्या दौ-यावर येत असून, भारताला अधिक राफेल लढाऊ विमाने विकण्याचा मार्ग या वेळी मोकळा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ३६ लढाऊ विमाने विकण्याबाबत त्यांच्या दौºयात दोन्ही बाजूंनी चर्चा होईल. या वेळी राफेलबरोबरच पाणबुडीच्या महानिविदेबाबतही विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मार्कोन यांच्या डिसेंबरमध्ये होणा-या भारत भेटीच्या तयारीसह राफेल विक्रीवरही चर्चा अपेक्षित आहे. येत्या शुक्रवारी त्या नागपूरला जात असून, तेथे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. राफेल करारांतर्गत उभारण्यात येणा-या डेसॉल्ट व रिलायन्स डिफेन्सच्या प्रकल्पांची पायाभरणी या वेळी केली जाईल.
मागील सप्टेंबरमध्ये भारत व फ्रान्सने ३६ राफेल जेट लढाऊ विमानांचा २०१९ ते २०२२ या काळासाठी करार केला. भारतीय हवाई दलाने दोन इंजिनांच्या फायटर जेटची गरज प्रतिपादित केली व अधिक राफेल जेट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. तथापि, भारताची मिग-२१ व मिग-२७ मालिकेतील अनेक लढाऊ विमाने कालबद्धरीत्या मोडीत काढण्यात आल्याने नव्या एकल इंजिनांच्या फायटर इंजिनांची उणीव भासत आहे. त्यामुळे सध्या एकल इंजिनांच्या लढाऊ विमानांची गरज आहे, असे हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी या महिन्याच्या प्रारंभी सांगितले होते.
भारतीय हवाई दलाला ४२ फायटर स्क्वाड्रन्सची गरज असताना सध्या ३२ वरच काम भागविले जात आहे.
आगामी काळात यात आणखी तूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाला आणखी राफेल खरेदी करणे गरजेचे आहे, असे एका अधिकाºयाने सांगितले.