Fraud: फोनवरून रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग खबरदार, IRCTC चं हे अॅप करू शकतं अकाऊंट खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:52 PM2023-04-21T15:52:46+5:302023-04-21T15:53:12+5:30
IRCTC Fake App: तुम्हीही रेल्वेच तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या अॅपचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या माध्यमातून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो.
हल्ली रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेचं तिकीट बुक करणाऱ्यांपेक्षा ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हीही रेल्वेच तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या अॅपचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या माध्यमातून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो. ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाणा वाढत असतानाच या क्षेत्रातील ठग मंडळी लोकांना फसवण्यासाठी नवनवे मार्ग शोधून काढत आहेत. आता या गुन्हेगारांनी लोकांना फसवण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. तसेच याची अनेक लोक शिकार झाले आहेत. दरम्यान, हे प्रकार समोर आल्यापासूनआयआयसीटीसीचंअॅप कंपनीसुद्धा सतर्क झाली आहे. तसेच युझर्सना एक नोटिफिकेशनही पाठवलं आहे.
भारतीय रेल्वेचं अधिकृत ऑनलाईन तिकिट बुकिंग पोर्टल असलेल्या आयआरसीटीसीने अँड्रॉइड मोबाईल फोन युझर्सना इशारा दिला आहे. या इशाऱ्यामध्ये कंपनीने सल्ला दिला आहे की, अँड्रॉईड फोनवर आयआरसीटीच्या नावाने चालणारी बनावट अॅप डाऊनलोड करणे टाळा, कारण त्यामाध्यमातून तुम्ही ऑनलाईन फसवणुकीची शिकार होऊ शकता.
आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या अॅपला डाऊनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्या अॅपचं नाव irctcconnect.apk असं आहे. तसेच आयआरसीटीसीने https://irctc.creditmobile.site या वेबसाईटवरही न जाण्याचा सल्ला दिला आहे. हे अॅप व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात होते. या अॅपची लिंक कुठल्याही युझरकडे आली, तर त्यावर क्लिक न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कारण या अॅपच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होत आहेत.
जर तुम्ही हे अॅप डाऊनलोड केलं, तर तुमची बँक डिटेल्स, यूपीआय डिटेल्स, क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स लीक होईल. त्यामुळे तुमचं प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकतं. आयआरसीटीसी कधीही लोकांकडे त्यांचे पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स, नेट बँकिंग पासवर्ड किंवा यूपीआयची डिटेल्स मागवत नाही. जर तुम्ही हे बनावट अॅप डाऊनलोड केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही Google Play Store वरून IRCTC चं अधिकृत असलेलं ‘IRCTC Rail Connect’ हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करा.