फॅब इंडियाकडून खादीच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक
By Admin | Published: February 13, 2017 03:43 PM2017-02-13T15:43:37+5:302017-02-13T15:43:37+5:30
खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री केल्याप्रकरणी फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री केल्याप्रकरणी फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅब इंडिया खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री करत असून, ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आलं आहे. त्यामुळे खादी, ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. फॅब इंडियाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कडक कारवाईचा इशारा खादी व ग्रामोद्योग आयोगानं दिला आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग हे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या सगळ्यावर प्रकारावर आयोगाच्या अध्यक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना म्हणाले, प्रतिष्ठा जपण्याच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण कारागिरांच्या हिताला बाधा पोहोचवून फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा कायद्यांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. भारतातील खादीचा व्यापार आणि खादी उत्पादनांच्या विक्रीसाठी खादी चिन्ह नियमन कायदा २००३ आणि खादी, ग्रामोद्योग आयोगाच्या कायद्यांतर्गत काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार खादीच्या कोणत्याही उत्पादनाची खादी मार्क असल्याशिवाय विक्री करता येत नाही.
खादीचे उत्तम कपडे मिळवण्यासाठी फॅब इंडिया प्रसिद्ध आहे. परंतु आता फॅब इंडियाला पाठवण्यात आलेल्या नोटिशीमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. फॅब इंडियाच्या दुकानांत मिळणाऱ्या कपड्यांवर फॅब इंडिया कॉटन असा टॅग असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्याची गंभीर दखल घेऊन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने फॅब इंडिया कंपनीचे सीईओ विनय सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.