मोदींच्या योजनेचे आमिष दाखवून महिलेने घातला लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 09:47 AM2018-06-20T09:47:21+5:302018-06-20T09:47:21+5:30
मोदींच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने गावकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.
लखनौ - मोदींच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने गावकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशमधील निगोहा येथील भद्दी शीर्ष गावात हा प्रकार घडला असून, फसवणूक झालेल्या गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगोहा येथील पोलीस इन्स्पेक्टर चॅम्पियनलाल यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी या महिलेचे फोटो काढून ठेवले होते.त्याआधारावर या महिलेचा शोध सुरू आहे.
उत्तर प्रदेशमधील एका गावात महिलेने मोदींच्या योजनेचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गावकऱ्यांचा लाखो रुपयांचां गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. भद्दी खेडा येथील मजरे शीर्ष गावात राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, आठवडाभरापूर्वी एक महिला आपल्या दोन मुलांसह एका टबमध्ये काही भांडी घेऊन गाव आली. तिने आपला पत्ता मदाखेडा निगोडा असा सांगितला. आपल्या पतीचे सोन्या, चांदीच्या भांड्यांचे दुकान असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जुनी भांडी त्यावर 20 रुपये अधिक भरल्यावर नवी भांडी आणि जुने दागिने दिल्यावर त्यावर दहा टक्के अधिक दागिने किंवा पैसे देण्याची योजना लागू करण्यात आली आहे, असे तिने सांगितले. तिच्या या भुलथापांना बळी पडून गावातील महिलांनी आपल्याकडील जुनी भांडी त्या महिलेला दिली.
याचदरम्यान, गावातील एका महिनेने आपल्याकडील चांदीची पैंजणसुद्धा बदलण्यासाठी दिली. त्यानंतर या महिलेने दुसऱ्या दिवशी संबंधित महिलांना जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवी भांडी आणि जुनी पैंजण देणाऱ्या महिलेला नवी पैंजण दिली. हे पाहून गावातील इतर महिलांनी मोह आवरता आला नाही. त्यांनीही आपल्याकडील दागिने दिले. मात्र एक आठवडा उलटला तरी नवे दागिने देण्यासाठी ही महिला गावात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी निगोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, फरार महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.